ठाणे : डीजी ठाणे हा प्रकल्प शहरातील नागरिकांसाठी तसेच विविध व्यावसायिकांसाठी मोठे व्यासपीठ ठरणार असल्याचे मत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केले. ठाणे महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी डीजी ठाणे प्रकल्पातंर्गत शनिवारी शहरातील व्यापारी संघटना, सुपर मार्केट चालक, ज्वेलरी असोसिएशन, ठाणे रिटेल ट्रेड वेल्फेअर असो., हॉटेल व्यावसायिक, फास्टफूड व्यावसायिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत ते बोलत होते.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी बोलताना सांगितले की, डीजी ठाणे या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशासन ते नागरिक, व्यापारी ते नागरिक आणि नागरिक ते नागरिक अशा स्तरावर काम चालणार असून या निमित्ताने हे सर्व घटक एकमेकांशी बांधले जाणार असल्याने नागरिकांना आणि उद्योजक आणि व्यापा-यांनाही याचा फायदा होणार आहे. डीजी ठाणे हे या सर्व घटकांसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण होणार असून याचा ठाणे शहराला फायदा होणार असल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केले.