डीजेने वाजवला ‘ब्रास बॅन्ड’चा बाजा

0

पुणे (सोनिया नागरे) । लग्नसराई, मुंज, वाढदिवस एवढेच नव्हे तर अंत्यसंस्कार, दशक्रिया, तेरावं आदी प्रसंगी चालत आलेली प्रथा म्हणजे पारंपरिक वाद्यवादन. परंतु मराठमोळी वाद्यसंस्कृती असलेली ब्रास बॅन्ड पथके कालबाह्य होत आहेत. पूर्वी सनई चौघडे, बासरी, तुतारी, ढोलताशे, खुळखुळा, बाजा असे. त्यानंतर बॅन्जो, सोजाफोन, एफोनिअम, ट्रम्पेट अशी वाद्ये प्रसंगी वाजविली जात. मात्र आधुनिकतेच्या अनुकरणामुळे पारंपरिक वाद्यसंस्कृती भोवती आधुनिक डीजेचे वलय तयार झाले आहे. परिणामी ब्रास बॅन्डचा बाजा वाजला असून पारंपरिक कलेकडे नाइलाजाने पाठ फिरवीत, अन्य कामे करण्याखेरीज कोणताही मार्ग या कलाकारांकडे उरला नाही. महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यांतून पारंपरिक वाद्य कलाकार शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. दुष्काळ, नापिकी, सततचा कर्जबाजारीपणा, पोकळ आश्‍वासने, तुटपुंजे अर्थसहाय्य यामूळे ग्रामीण भागात अत्यंत हलाखीची स्थिती आहे. याचा परिणाम कलाकारांच्या रोजंदारीवर झाला आहे.

मोर नाचविणे, हलगीसारख्या कला आता आधुनिक स्वरूपात
मात्र शहरातील लोक पारंपरिक कलेचा वारसा जपणार्‍या ब्रास बॅन्ड पथकापेक्षा आधुनिक डीजेला अधिक पसंती देत आहेत. एरव्ही आपल्या वाटणीचा हिस्सा सहकार्याला देणार्‍या या कलाकारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. अशातच काही कलाकार डीजे पथकांत कामे करू लागली तर कित्येकजण मोलमजुरी करताना दिसत आहेत. बाकी उरलेल्या कलाकारांची परिस्थिती हलाखीची आहे. गणेशोत्सव ते लग्नसराईचा काळ वगळता इतरवेळी कोणतेही काम उपलब्ध नसल्याने या कलाकारांवर बेकारीचे संकट ओढवले आहे. मोर नाचविणे, हलगीसारख्या पारंपारिक कला आता आधुनिक स्वरूप घेत नागीण व डिस्को डान्समध्ये
रुपांतरीत झाल्याचे आढळते.

कानाला सुखावणार्‍या सुरांवर डीजेचा हल्ला
लग्न म्हटले की सर्वत्र धामधूम, आनंदाला आलेले नवे उधान हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी त्यात येणारी वाजंत्री ही आली. परंतु कानाला सुखावणार्‍या पारंपरिक वाद्यांमध्ये आता कर्णकर्कश्श डीजेनी शिरकाव केला आहे. या कर्कश्श आवाजाने मानसिक विकारांपासून अनेक शारीरिक आजारही होतात. याशिवाय अनेक जयंत्या, अध्यात्मिक कार्यक्रम, मोर्चे, निवडणुका आशा विविध कार्यक्रमांतही डीजेचा सर्रास वापर केला जातो. परिणामी ध्वनिप्रदूषणच नव्हे तर वाहतूककोंडीचे प्रकारही होताना आढळतात. मोठमोठ्या स्पिकर्स भिंती आणि डीजेच्या गाण्यांवर बीभत्सीत अंगविक्षेप करून थिरकणारी तरुणाई पाहली की हीच का आपली संस्कृती असा प्रश्‍न पडतो.

ढोल-ताशांचा वापर केवळ नावालाच
शहरात गणेशोत्सवादरम्यान ढोल-ताशे वाजविण्याची क्रेझ तरुणाईत वाढते आहे, पण केवळ हौस म्हणून! गणेशोत्सवात पारंपरिकतेला उधान येते मात्र लग्नसराईत व इतरप्रसंगी पारंपरिकतेचा आव आणणारी हीच तरुणाई अत्याधुनिक डीजेच्या तालावर तासन्तास थिरकताना सर्वत्र पाहायला मिळते.

सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियम लागू केले आहेत. यामध्ये रात्री 10 ते सकाळी 8 यावेळात सार्वजनिक ठिकाणी 10 डेसीबल तर वस्त्यांमध्ये 5 डेसीबलपेक्षा अधिक आवाज नसावा असे स्पष्ट निर्देश असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. पारंपरिक ब्रास बॅन्ड कलेला मान होता परंतु आता काम मिळत नसल्याने कलाकारांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. कामधंद्यासाठी शहरात आलोय पण आधुनिक डीजेच्या बाजारीकरणामुळे ब्रास बॅन्डला लोक पसंती देत नाहीत. लोकांना फक्त गोंगाट आणि नवीन सिनेसंगीत हवे असते त्यामुळे पारंपरिक वाजंत्री व गाणी वाजवली जात नाहीत.
-बाळासाहेब घोरपडे, धायरी, (मूळ, अहमदनगर)

तरुण कलाकार पारंपरिक व्यवसाय सोडून शिक्षणाला प्राधान्य देत केवळ पारंपरिक वाद्यांची प्रथा, लोकगीतांची ओळख पुढील पिढीला व्हावी म्हणून जोडकाम स्वरूपात ब्रास बॅन्ड चालवितो. परंतु लोकांची डीजेविषयी वाढती मागणी पाहता ब्रास बॅन्ड नाहीसे होत असल्याचे दिसताहेत. आज काम नसल्याने 20 ते 30 कामगार बसून आहेत. मजुरीचे कामही रोज मिळत नाही.
– सागर भोसले, वडगाव बुद्रुक

सुमारे 28 वर्षांपासून ब्रास बॅन्ड व्यवसायात असून पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय येत्या पाच वर्षात कालबाह्य होण्याचे चित्र दिसत आहेत. डीजेच्या वाढत्या मागणीमुळे ग्राहकही मिळत नाहीत. कामगारांना देण्यात येणारे मानधन देणेही परवडत नाही. सनई चौघडे, तुतारी वादन लग्नात फक्त देखावा म्हणून केले गेले जाते आणि लग्नात डीजेचा सर्रास वाजविल्या जातो.
– चव्हाण बंधू, ब्रास बॅन्ड व्यावसायिक, सिंहगड रोड

पारंपरिक वाद्यांचे जतन आम्ही कलाकार तुटपुंज्या मानधनावर करायलासुद्धा तयार असतो. शुभप्रसंगी मोर नाचविण्याची प्रथा मी जोपासतो आहे. सोबतच खुळखुळाही वाजवितो. राष्ट्रीय पक्षी वाचविण्यासाठी कलेच्या माद्यमातून संदेश देऊन व करमणूक व मनोरंजन करण्यासाठी मोर नाचवतो म्हणजे मोराचा पोशाख परिधान करून नृत्य करतो आहे. परंतु लोकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता ही प्रथा संपुष्टात आली आहे. म्हणून हे सोडून रणरणत्या उन्हात 8-10 तास मोलमजुरी करावी लागते आहे.

– बाबासाहेब दोडके, पारंपरिक वाजंत्री कलाकार