पुणे : गणपती विसर्जन मिरवणुमध्ये डीजे वाजवण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी पुण्यातील गणेश मंडळं एकत्रित आली आहेत. ‘डीजेला परवानगी न दिल्यास विसर्जनही करणार नाही,’ असा इशाराच शहरातील मंडळांनी दिला आहे.
पुण्यातील ८० हून अधिक मंडळाच्या शिष्टमंडळानं आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ध्वनी प्रदूषणाचे कारण देत न्यायालयानं गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी केली आहे. हा वाद उच्च न्यायालयातही गेला होता. मात्र, तिथंही गणेश मंडळांना दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयानं स्थगिती कायम ठेवली. मंडळांनी यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरलं असून ‘सरकार हिंदूंच्या सणावर गदा आणत आहे. सरकारनं न्यायालयात मंडळांची बाजू योग्यरित्या मांडली नाही. तसंच, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मंडळांना वेळही देण्यात आलेला नाही, अशी भावना मंडळांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
डीजे सिस्टीमला सरकारने परवानगी द्यावी, अन्यथा कोणतंही मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार नाही. सरकारचा निषेध करत मंडळं आपला गणपती मांडवातच ठेवतील,’ असा निर्धार मंडळाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे.