‘डीपीडीसी’च्या निवडणुकीसाठी पिंपरीतून 13 अर्ज दाखल

0

पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सप्टेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. रिक्त असणार्‍या 40 जागांसाठी निवडणूक होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या आठ आणि राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आमदार व खासदार यांचा निधीही जिल्हा नियोजन समितीच्या अधिकारामध्येच खर्च करण्यात येतो. समितीचे अध्यक्ष पालकमंत्री तर सचिव जिल्हाधिकारी असतात. पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद पहिल्यांदाच वाढली असल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेच्या 75 सदस्यांमधून 17 जणांची वर्णी लागणार आहे. तर महापालिकेच्या 287 जागांमधून 21 सदस्य निवडले जाणार आहेत. तसेच, नगरपालिकेच्या 291 जागांमधून दोन जण निवडले जातील. शासन नियुक्त 18 आणि दोन जागा राज्यपाल नियुक्त आहेत.

यांनी दाखल केले अर्ज
पिंपरी-चिंचवड महापालिकेतून सत्ताधारी भाजपकडून आठ तर राष्ट्रवादीकडून तीन नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. भाजपकडून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सीमा सावळे, ओबीसी महिला जयश्री गावडे, ओबीसी पुरूष नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, खुल्या प्रवर्गातून एकनाथ पवार, नितीन लांडगे, सर्वसाधारण महिला माई ढोरे आणि आरती चोंधे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर, राष्ट्रवादीकडून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सुलक्षणा धर, खुल्या प्रवर्गातून मयुर कलाटे, सर्वसाधारण महिला उषा वाघेरे, ओबीसी प्रज्ञा खानोलकर, ओबीसी पुरूष श्याम लांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 29 रोजी अर्जांची छाननी होणार आहे. आठ सप्टेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. तर, 18 सप्टेंबरला मतदान होणार असून त्याचदिवशी निकाल लागणार आहे.

बिनविरोधसाठी पालकमंत्री प्रयत्नशील
सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट प्रयत्नशील आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 287 जागांमधून 21 सदस्य निवडले जाणार आहेत. पिंपरीतून आठ नगरसेवकांनी अर्ज भरले असून, पुणे महापालिकेतून 11 नगरसेवकांनी अर्ज भरले आहेत. विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, पुणे जिल्हा नियोजन समितीवर पिंपरी महापालिकेतून राष्ट्रवादीचे तीन सदस्य निवडून येऊ शकतात. पिंपरीतील पाच सदस्यांनी अर्ज भरले आहेत. दोन सदस्य सहज निवडून येऊ शकतात. तर, पुणे महापालिकेतूनदेखील काही सदस्य निवडून येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.