डीपीडीसीतून जिल्हा पोलीस दलासाठी वाहने खरेदीला मंजुरी !

0

जळगाव । जळगाव जिल्हा पोलीस दलात लवकरच नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा ताफा दाखल होणार असून जिल्हा नियोजन समितीने याला परवानगी दिली आहे. या माध्यमातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पोलीस विभागाला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 29 बोलेरो चारचाकी व 70 हिरोहोंडा मोटार सायकलीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या ही खूप कमी आहे. यातच सध्याची अनेक वाहने ही जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी ही डोकेदुखी ठरत असते. याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस दलासाठी नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांची आवश्यकता असल्याची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. याला पालकमंत्र्यांनी तत्काळ होकार दिला होता. मध्यंतरी कोविडच्या आपत्तीमुळे अन्य कामांच्या खर्चावर मर्यादा होती. आता ही मर्यादा दूर झाल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने वाहन खरेदीला मंजुरी मिळवून दिली आहे. जिल्हा नियोजन समितीने आज 29 महेंद्रा बोलेरो (बीएस-4) आणि 70 होंडा शाईन दुचाकींना खरेदीची मंजुरी दिली आहे. यासाठी 2 कोटी, 30 लक्ष, 96 हजार, 478 रूपयांची तरतूद करण्यात आलेली असून पोलीस दलात वाहनांचा नवीन ताफा दाखल होणार असल्यामुळे विविध गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे.