डीपी रस्त्यावरील बांधकामे सात दिवसांत पाडणार

0

पुणे : राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यान मुठा नदीपात्रातील ब्लू लाइनमध्ये असलेल्या बांधकामांचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला असून, त्यानुसार कारवाई करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वाक्षरी केली आहे. येत्या सात दिवसांत या अनधिकृत बांधकामांवर नियोजनपूर्वक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कुणाल कुमार यांनी दिली.

राजाराम पूल आणि म्हात्रे पूलादरम्यान डीपी रस्त्याच्या कडेला नदीपात्रात असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) महापालिका आणि पाटबंधारे विभागाला दिले. याबाबत काही रहिवाशांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर एनजीटीने हा निर्णय दिला. मात्र एनजीटीने दिलेल्या आदेशानंतर महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांनी नदीपात्रातील बांधकामे, ब्लू लाइनमध्ये झालेले अतिक्रमण या सर्वांची पाहणी करून अहवाल ठेवण्यात येईल, असे सांगितले. त्यानुसार एक आठवड्यानंतर 19 जुलैला हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यातून नदीपात्रात आणि पूररेषेत 30 अनधिकृत बांधकामे असल्याचे दिसून आल्याचे प्रशासनाने अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे आता नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकामांचे चित्रही स्पष्ट झाले आहे.

या कारवाईसाठी महापालिका आयुक्तांची मंजुरी आवश्यक होती. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी 24 जुलैला या संदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्तांपुढे ठेवला होता. त्यावर आयुक्तांनी 25 जुलैला त्यावर स्वाक्षरी केली. यामुळे आता कारवाईचा मार्गही मोकळा झाला असून, सात दिवसांत ही कारवाई पूर्ण करण्यात येईल.