डीबीटी योजना बारगळली

0

पुणे । महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘डायरेक्ट टू बेनिफिट’ (डीबीटी) योजना अवघ्या वर्षभरातच बारगळणार आहे. या योजनेर्तंगत विद्यार्थ्यांना निकृष्ट साहित्य पुरविण्याचे प्रकार समोर आल्यानंतर आता पुढच्या वर्षी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यापूर्वी निविदा प्रकियेद्वारे साहित्य पुरविले जात होते, मात्र त्यात होणार्‍या गैरव्यवहारांच्या प्रकारानंतर राज्य शासनाने थेट विद्यार्थ्यांना साहित्य खरेदीसाठी पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने मात्र साहित्य पुरविण्यासाठी डीबीटी योजना राबविली असून त्यात 43 व्यावसायिकांचा समावेश केला आहे. या व्यावसायिकांकडून विद्यार्थ्यांना साहित्य पुरविले जात असून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कॅशकार्डमधून साहित्यांची रक्कम अदा केली जात आहे. मात्र यामधील काही ठेकेदारांनी निकृष्ट साहित्य पुरविल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला टिकेला सामोरे जावे लागत आहे. त्यावर आता प्रशासनाने हे सर्व प्रकार टाळण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षांपासून डीबीटी योजनेद्वारे साहित्य वाटप न करता थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भाडार विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी यासंबधीची माहिती दिली, आता विद्यार्थ्यांची बँक खाती खोलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील वर्षी विद्यार्थ्यांना थेट दुकानात जाऊन त्यांच्या पसंतीचे आणि गुणवत्ताधारक वस्तुंची खरेदी करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत असलेले साहित्य निकृष्ट असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आता प्रशासनाने सर्वच साहित्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नक्की कोणते साहित्य निकृष्ट आहे, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.