चार तास ठिय्या आंदोलन : जळगावसह अमळनेर, चोपड्यातील विद्यार्थी धडकले
यावल- आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना वस्तीगृहाच्या खानावळीतूनच आहार देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट आहाराचे अनुदान (डीबीटी योजना) देण्याबाबात शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात (राज्यव्यापी आंदोलनांतर्गत) तसेच अन्य 15 शैक्षणिकमागण्यांसाठी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हयातील आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडक देत शासनाच्या या योजनेच्या जोरदार विरोध केला. सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले तर शासन विरोधी घोषणा देण्यात आल्या. जिल्हयातील सुमारे 500 विद्यार्थी येथे सोमवारी येवून धडकले. आंदोलकामध्ये विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
डीबीटी योजनेस विरोध
राज्यातील आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहात गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटदारामार्फत विद्यार्थ्यांना भोजन दिले जात होते मात्र आता त्याऐवजी भोजन अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करून त्यांनी परस्पर जेवणाची व्यवस्था करावी, अशी ही शासनाची डीबीटी योजना आहे. शासनाने ही योजना राबविण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. या योजनेस जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा विरोध आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जळगावसह अमळनेर, चोपडा येथील विद्यार्थ्यांनी यावल कार्यालयावर धडक दिली. सुमारे चार तास विद्यार्थ्यांनी शासन विरोधी व प्रकल्प कार्यालयाविरोधी घोषणा दिल्या. मागण्यांचे निवेदन प्रकल्पाधिकारी आर.बी.हिवाळे यांना देण्यात आले. निवेदनामध्ये चोपडा वस्तीगृहाचा वाढीव कोटा मंजूर करावा, डी.बी.टी. योजना तत्काळ रद्द करावी यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. आंदोलन समितीचे जिल्हा प्रमुख होमा वसावे, तुषार पवार, अॅड.जुम्मासींग बारेला, भारती पराळके या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात करण्यात आले. फौजदार सुनीता कोळपकर व सहकार्यांनी बंदोबस्त राखला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.