पुणे-बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी अटक झालेले बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना पुणे न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे या तीन अधिकाऱ्यांनाही अटक झाली होती. रवींद्र मराठे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर अन्य तिघांच्या वतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.
गुरुवारी विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत पोलिसांकडून काही अर्टी आणि शर्थींवर जामीन देण्यात यावा, असे सांगण्यात आले. मात्र, विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी आरोपींच्या जामीन अर्जास विरोध केला होता. गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली होती. शुक्रवारी विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी जामीन अर्जावर निर्णय दिला. न्यायालयाने राजेंद्रकुमार गुप्ता, सुशील मुहनोत आणि नित्यानंद देशपांडे या तिघांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.