कात्रज । चॉकलेटचे पैसे मागितल्यामुळे राग आल्याने नऊ पैलवानांनी कात्रज बाह्यवळण मार्गावर असणार्या डी-मार्टची तोडफोड करत तेथील कर्मचार्यांना मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी डी-मार्टचे व्यवस्थापक बाबासाहेब पाटील (48) यांनी भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली असून नऊ पैलवानांना पोलिसांनी अटक केली तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.
हर्षवर्धन शेळके (24), राजवर्धन वाडकर (21), विकास भागवत(21), विराज जोरी (20) ओंकार खाटपे (20) गणेश मोरे (24) प्रकाशळ पोकळे (19) सागर कानगुडे (19) आणि आकाश चौधरी (सर्व रा.कात्रज) अशी अटक केलेल्या पैलवानांची नावे आहेत.आरोपी कात्रज परिसरात असलेल्या एका कुस्ती संकुलात कुस्तीचे धडे गिरवत आहेत. घटनेच्या दिवशी ते डी-मार्ट मध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने चॉकलेट घेतले होते. त्याचे पैसे न देता ते तसेच बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यामुळे एका कर्मचार्याने त्यांच्याकडे पैशाचे मागणी केली. याचा राग आल्याने या सर्व पैलवानांनी कर्मचार्यासोबत वाद घालत त्याला आणि सुरक्षारक्षकाला मारहाण केली आणि डी-मार्टमधील साहित्याची तोडफोड केली. पोलिसांनी या सर्व पैलवानांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज ताटे अधिक तपास करीत आहेत.