मुंबई । दोन मिनिटांत न्याहारी करता यावी, म्हणून मॅगी हे उत्तम खाद्य प्रकार समजले जाते. मात्र, भुकेच्या तडाख्यात उकळत्या पाण्यात घाईघाईने मॅगीचे पाकीट फोडून ते लागलीच गरम, उकळत्या पाण्यात टाकले जाते. घरोघरी हे प्रकार सर्रासपणे घडत असतात. मात्र, नालासोपारा येथील डीमार्टमधून विकत आणलेल्या मॅगीच्या पाकिटातून चक्क अळ्या आणि किडे आढळले. त्यामुळे मॅगी कंपनीसह डीमार्टच्याही विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नालासोपारा पश्चिम येथील जयमाला इमारतीत राहणारे नितीन गोवळकर यांनी रविवारी डी-मार्टमधून मॅगी विकत आणली. मात्र, घरी मॅगी बनवायला घेतल्यावर त्यात चक्क अळ्या आणि किडे त्यांना आढळून आले. त्यामुळे तुम्हीही जर असे प्लास्टिकबंद खाद्यपदार्थ आणत असाल तर ते खाताना काळजी घ्या. याप्रकरणी संबंधित कंपनीकडून अजून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.