पुणे । डी. वाय. पाटील डेंटल स्कूलच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. या घोटाळ्यात पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी सामील असावेत, अशी शक्यता पार्टीने व्यक्त केली आहे.डॉ. डी. वाय. पाटील नॉलेज सिटी, लोहगावमधील सुमारे 150 रोजंदारीवरील कामगारांना महापालिकेच्या येरवड्यातील राजीव गांधी इस्पितळात घाईघाईने भरती केले, या प्रकारातून वैद्यकीय शिक्षणातील घोटाळ्याचा पर्दाफाश केला. भरती केलेल्यांपैकी कोणीही आजारी नव्हते. पण वैद्यकीय शिबीर आहे, असे सांगून पाटील दंतवैद्यकीय कॉलेजमधील अधिकार्यांनी बोगस कागदपत्राद्वारे त्यांना भरती केले होत, असे आम आदमीच्या पत्रकात म्हटले आहे.
या घटनेची तसेच डॉ. डी. वाय. पाटील दंतवैद्यकीय महाविद्यालयाच्या आणखी इतर घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी आम आदमी पार्टी पुणेच्यावतीने डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाकडे रीतसर तक्रार करण्यात आली आहे. महापालिकेचे राजीव गांधी इस्पितळ हे डॉ. डी. वाय. पाटील दंतवैद्यकीय महाविद्यालय केवळ कागदोपत्री वापरत असून फक्त कौन्सिलच्या निकषांची कागदोपत्री पूर्तता करणे हाच त्यामागे उद्देश आहे. अशा प्रकारे महाविद्यालयाचे अधिकारी डेंटल कौन्सिलची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. पालिकेच्या अधिकार्यांचे या घोटाळ्यात लागे बांधे असण्याची शक्यता पार्टीने व्यक्त केली असून आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे. या घोटाळ्यात नागरिकांचे नुकसान झाले आहे. याची चौकशी व्हावी आणि दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, पालिकेने पाटील कॉलेजशी केलेला अभद्र करार रद्द करावा, अशी स्पष्ट मागणी केली आहे.