पिंपरी-चिंचवड : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांची जोपासना व्हावी, या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटी संचलित डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथे सांस्कृतिक विभागाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यक्तिमत्त्व एज्युकेशन मल्टीमीडिया रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण दामले यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मोहन वामन, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सतीश ठाकर हेदेखील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
विज्ञान विभागातील विद्यार्थिनी शिवानी दुबे व माया चैरिया यांनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक स्वप्नाली जाधव, गीतांजली भडकुंडे, ऋचिता काळे यांनी केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. बाळकृष्ण दामले यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच आपल्या अंगी असलेले इतर कलागुणदेखील जोपासवेत, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक यांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी क्षीतिजा देव हिने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. सतीश ठाकर तसेच सांस्कृतिक विभागातील समितीने केले.