डुकरांच्या विळख्यात अडकले पालिकेचे उद्यान!

0

येरवडा । येरवडा भागातील पालिकेच्या इंद्रप्रस्थ उद्यानात डुकरांचे साम्राज्य पसरले आहे. यावर पालिका उद्यान विभाग योग्य उपाययोजना करून दुरवस्था झालेल्या उद्यानाचे सुशोभीकरण करणार का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर संघटक जावेद इनामदार यांनी केला असून उद्यानाची लवकरात लवकर डागडुजी न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इनामदार यांनी दिला आहे.

उद्यानात विद्युत विभागाच्या वतीने पथदिवे बसविण्यात आले आहेत. पण ते बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात दारुड्यांना मोकळे रान सापडले असून उद्यान हे दारुड्यांचा अड्डा बनला आहे. उद्यानाची सुधारणा करण्याची मागणी इनामदार यांनी केली आहे. उद्यानाच्या सुधारणेची दखल न घेतल्यास पक्षाच्या वतीने उद्यान विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इनामदार यांनी दिला आहे. यावेळी पक्षाचे राजू भालशंकर, मनोज पाचपुते, नितीन राठोड, गौरव शर्मा, नितेश चंडालिया, अकील सय्यद, शुभम साबळे, रोहित राठोड, महेश पाटील, महेश हांडे उपस्थित होते.

टाकीचे नळही गायब
सध्या शहरासह उपनगरांमध्येही बाग-उद्यानांची कमतरता जाणवत आहे. त्यातच पालिकेच्या उद्यानांची देखभाल योग्य रितीने होत नाही अशी ओरड स्थानिकांकडून होत असली तरीही पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने शहरासह उपनगर भागात उद्यानांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. मात्र यास अपवाद ठरत आहे. ते येरवडा प्रभाग क्र. 6मधील ‘इंद्रप्रस्थ उद्यान.’ कारण उद्यानात प्रवेश केल्यावरच येथील सुरक्षारक्षकांसाठी आलेल्या खोलीची दुरवस्था झाली आहे. नागरिकांसाठी पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. तिचीही हालत झाली असून टाकीचे नळही परिसरातील नागरिकांनी गायब केले आहेत.

डुकरांचे वस्तीस्थळ
नागरिकांनीच या उद्यानाचा वापर डुकरे पाळण्यासाठी केला आहे. डुकरांच्या मुक्त वावरामुळे हे उद्यान आहे की, डुकरांचे वस्तीस्थळ असा प्रश्‍न नागरिकांना सतावत आहे. या परिसरातच अनेक भागात खोल खड्डे घेऊन त्यात पाणी सोडून परिसर चिखलमय करण्यात आल्याने डुकरे मोकाटपणे वावरत आहेत. येथील कर्मचारी साफसफाई करण्यास आल्यास उद्यान भिंतीच्या बाजूने काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात येते. त्यांच्या या दहशतीमुळे कोणी ही कर्मचारी काम करण्यास तयार होत नसल्याने उद्यान हे ओसाड व अस्वच्छ झाले आहे. जर नागरिकांकडून पालिकेच्या उद्यानाचा असा गैरवापर होत असेल तर झोपी गेलेले पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना जाग कधी येणार? का त्यांच्या आशीर्वादाने येथे दहशत पसरवली जात आहेत का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

रेलगाडी व खेळांचे साहित्यही पळवले
छोट्या मुलांसाठी लाखो रुपये खर्च करून झोके, घसरगुंडी असे खेळ बसवण्यात आले होते. परंतु आता केवळ त्यांचे सांगाडे शिल्लक राहिले आहे. विशेष म्हणजे रेलगाडीही उभारण्यात आली होती. मात्र येथील समाज कंटकांच्या दहशतीमुळे ती बंद आहे. रेल्वे इंजिनचे काही साहित्यही गायब झाले आहे. अनेक ठेकेदारांनी पावसाळी लाइनसाठी लागणारे पाइप हे उद्यानातच टाकले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या जागेचा गैरवापर होत असल्याचे उघड आहे. विशेष म्हणजे येथे अज्ञातांकडून खुलेआम झाडांची कत्तल झाली असताना याकडे एकाही पालिका अधिकार्‍याने लक्ष दिलेले नाही. उद्यानात येताना नागरिकांना आपण एखाद्या उद्यानात नाही तर स्मशानभूमीत आलो की काय? असा भास होत असावा इतकी ही परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे नागरिकांनी सायंकाळी उद्यानात येण्याची धास्ती घेतली आहे. इतकेच काय उद्यानात कर्मचार्‍यांशिवाय कोणीही फिरकत नाही.

ही दुर्दैवी बाब
उद्यानाची अशी काही समाज कंटाकांकडून दुरवस्था होणे हे चुकीचे आहे. पालिकेच्या वतीने करांमधून उभारलेल्या उद्यानांची अशी दुरवस्था होत असेल तर यासारखी दुर्दैवी बाब कोणती असू शकते. तरीही लवकरात लवकर उद्यानाची सुधारणा न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू.
– राकेश कामठे,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस