ठाणे : गुरुवारी आतकोनेश्वर नगरमध्ये परिसरात खेळणाऱ्या ४ वर्षाच्या चिमुरडीवर मोकाट फिरणाऱ्या डुक्करांनी जीवघेणा हल्ला केला. एका महिलेच्या सतर्कतेमुळे या चिमुरडीचा जीव वाचला अन्यथा दुर्दैवी घटना घडली असती. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट आहे. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांच्या जीवितावर आणि आरोग्यावर डुक्करांच्या सुळसुळाटाची टांगती तलवार लटकत आहे. हल्ल्यात गंभीर जखमी चिमुरडा कळवा रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
गुरुवारी सकाळच्या वेळेस आतकोनेश्वर नगरमध्ये घराच्या प्रागंणात खेळणारा ४ वर्षीय सुरज चंडालिया हा खेळात होता. परिसरात मोकाट वावरणाऱ्या एका डुक्कराने सुरज(४) याच्यावर हल्ला केला. तर मागून येणाऱ्या अन्य डुक्करांनी ही हल्ला केल्याने सुरज याची अवस्था बिकट झाली. त्याच्या ओरडण्याने एका महिलेने दृश्य पाहून आरडा ओरड केली. महिलेने प्रसंगावधान म्हणून हातातील बदली डुक्करांच्या दिशेने भिरकावली आणि पडलेल्या दगडही भिरकावल्यानंतर डुक्करांनी लचके तोडण्याचे थांबविले आणि पळाले. जर या महिलेने दुर्लक्ष केले असते तर दुर्दैवी घटना घडली असती अशी प्रतिक्रिया गंभीर जखमी सुरज ची आई लक्ष्मी चंडालिया हीने व्यक्त केली. चिमुरड्या सूरजला त्वरित कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन दिवस झाले मात्र चिमुरडा सुरज अजूनही अत्यावस्थेत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
आतकोनेश्वर नगरात डुक्करांचा सर्रास मोकाट वावर आहे. याकडे पालिकेने लक्ष वेधावे, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे आज दुर्दैवी घटना घडली. आज स्वाईनप्ल्यू सारख्या रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. अशा परिस्थितीत झोपडपट्टीत डुक्करांचा मोकाट वावर असल्यास मात्र अशा रोगांची लागण स्थानिक नागरिकांना होण्याची तीव्र संभावना असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्याने शाळकरी मुलावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर याच कालवा खारेगाव परिसरात एकाच भटक्या कुत्र्याने ७ नागरिकांचा लाव्हा घेतल्याची घटना घडली होती. तरी देखील पालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांच्या उपयोजनेबाबत दुर्लक्ष करीत आहे. आज आतकोनेश्वर नगरात डुक्करांच्या हल्ल्यात ४ वर्षाचा चिमुरडा सुदैवाने बचावला आतातरी पालिका प्रशासनाने मोकाट कुंत्र्यांचा आणि डुक्करांचा बंदोबस्त करावा अशा विविध प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.