पुणे । संपूर्ण शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, त्या संदर्भात गेल्या दोन महिन्यांत 5 हजार जणांना नोटिसा जारी करण्याची कारवाई करण्यात आली आहे. नोटिसांबरोबरच 492 मिळकतींकडून सुमारे 2 लाख 69 हजार 690 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.त्यामध्ये सर परशुराम भाऊ कॉलेजला 11 हजार रुपयांचा तर हिराबाई देसाई कॉलेज आणि महर्षीनगर येथील मॅक हॅँड्री या शाळेला प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. व्हीआयटी कॉलेजला 5 हजार रुपयांचा दंड करण्यात आला असून, त्यांनी दंड भरण्यास नकार दिला आहे. डेक्कन कॉलेजकडून दंड भरण्यात येणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
घोलेरोड, नगररोड, संगमवाडी, हडपसर-मुंढवा, धनकवडी, सहकारनगर भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. शहरात आजमितीला आतापर्यंत 934 संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी जुलै व ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे 228 आणि 534 संशयित आढळले होते. जुलै महिन्यात 58 तर ऑगस्टमध्ये 156 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले आहे. शहरातील 4 हजार 851 सार्वजनिक ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. तर 13 हजार 242 खासगी ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. 19 जून ते 23 ऑगस्टदरम्यान डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या 5 हजार 160 ठिकाणी नोटिसा बजावण्यात आल्या, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
2 लाखांचा दंड वसूल
शहरातील 492 मिळकतींमध्ये अळ्या सापडल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 69 हजार 690 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये शाळा, कॉलेज, काही हॉस्पिटल, मल्टिप्लेक्स, तसेच मॉलचा समावेश आहे. आता पुन्हा शहरात डेंग्यूच्या अळ्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारपासून औषध तसेच धूर फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. त्यात अळ्या सापडल्यास पुन्हा कारवाई केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.