डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला

0

बारामती । बारामतीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील आठवड्यात दोन विवाहितांचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. शहरातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयात बहुतांश रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही रुग्णांना उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले आहे. नगरपरीषद प्रशासन तसेच आरोग्य विभागामार्फत याबाबत खबरदारी तसेच उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु तो फोल ठरल्याचे दिसून येते. याबाबत ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बारामती शहरात गेल्या 15 दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरू आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात डेंग्यू बळावत आहे. औद्योगिक परिसरात एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने ठेवलेल्या तब्बल 2 हजार टायरमुळे या भागात डेंग्यूचे प्रमाण अधिक वाढत असल्याचा अंदाज प्रथमदर्शी बांधला जात आहे.

टायर उचलण्याची मागणी
परिवहन विभागीय कार्यालयाकडून गांभिर्यपूर्वक उपया योजना केली जात नसल्याने एसटी कार्यशाळेतील कर्मचार्‍यांसह आता शहरातील नागरिकांनाही डेंग्यूची लागण होऊ लागली आहे. कार्यशाळा परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पडलेले 2 हजार टायर उचण्याबाबत तसेच एसटी कार्यशाळा कर्मचार्‍यांनी आंदोलनही केले होते. कार्यशाळेतील कर्मचार्‍यांना डेंग्यू झाल्यानंतरही परिवहन अधिकार्‍यांचे डोळे उघडले नाहीत. तसेच याबाबत नगरपरिषदेनेही त्यांना फटकारले नाही. परिणामी डेंग्यूचे रूग्ण वाढू लागले आहेत.

नगरपालिकेचे दुर्लक्ष
अस्वच्छता तसेच डबक्यात साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. मात्र, याकडे नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील कसबा येथील उमा सोनवणे या महीलेचा (दि. 20) तर अमराई येथील संगिता कुडवे या महीलेचा (दि. 25) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नगरपरिषदेने आता तरी याबाबत ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

विषाणूंचा संसर्ग वाढला
ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस आणि तापमानात होणारा चढ-उतार यामुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यांत विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताप, डोके व घसादुखीच्या रुग्णांमध्ये सात-आठ दिवसांपासून वाढ झाली आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, तसेच विषाणुजन्य रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाला. वातावरणात झालेला बदल, ओलसर व चिखलमय रस्ते यामुळे संसर्गजन्य आजार वाढल्याचे दिसून येतात.

डेंग्यूचे रुग्ण कळविणे बंधनकारक
शहरातील खासगी रुग्णालयांमध्येदेखील थंडी तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच, खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी डेंग्यूचे रुग्ण सरकारी हॉस्पिटलला कळविणे बंधनकारक असल्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील माहिती एकत्रित केली जात आहे. शहरातील देसाई इस्टेट, जवाहरनगर, सुभाष चौक, कसबा परिसरात डासांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजाराने त्रस्त रुग्णांची संख्यादेखील अधिक आहे.

प्लेटलेट्सचा तुटवडा
डेंगीसह अन्य आजारांमध्ये रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्याचबरोबर पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्लेटलेट्स भरणे आवश्यक असते. मात्र, सध्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुण्याहून प्लेटलेट्स मागवावे लागतात. तोपर्यंत विलंब होतो. त्यात रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.