आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; चिकनगुनिया व मलेरियाचेही रुग्ण
पुणे : मागील दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव शहरात काही अंशी कमी झाला आहे. परंतू, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय चिकनगुनिया आणि मलेरियाचे रुग्णही आढळून येत आहे. त्यामुळे प्लेटलेटला मागणी वाढली आहे. गेल्यावर्षी डेंग्यूचे 3 हजार रुग्ण सापडले असून ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत सर्वाधिक रुग्णांची संख्या आढळून आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
डेंग्यूमुळे रुग्णांना प्लेटलेट्सची आवश्यकता अधिक असते. परंतु, काही ठिकाणी प्लेटलेट्सचा पुरवठा कमी असल्यामुळे नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. शहरात आजही डेंग्यू डासांची पैदास होणारी ठिकाणे सापडत आहे. शहरात आवश्यक त्या ठिकाणी औषध फवारणी करणे आवश्यक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही. दरम्यान, नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात पाण्याचे साचलेले डबके स्वच्छ करावे. त्यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास होणार नाही, असे आवाहन केले जात आहे. त्याला काही अंशी प्रतिसादही मिळत आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर पाहिजे त्या प्रमाणात कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सर्वाधिक 589 रुग्ण
गेल्या वर्षभरात 2 हजार 939 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये सर्वाधिक 589 रुग्ण ऑगस्ट महिन्यामध्ये आढळून आले होते. तत्पूर्वी स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने रुग्णांची संख्या दरमहा 400च्या वर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने वेळीच पावले उचलून डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी औषध फवारणी, जनजागृती करून डासांचे पैदासाची ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे.