डेंग्यूबाबत सदस्यांची चिंता व्यक्त

0

जळगाव । महापालिका स्थायी सभा प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी उपायुक्त चंद्रकांत खोसे, नगरसचिव अनिल वानखेडे आदी उपस्थित होते. 1 ऑक्टोबर रोजी स्थायी सभागृहातील 8 सदस्य निवृत्त होणार आहेत. यात शामकांत सोनवणे, दत्तात्रय कोळी, ज्योती इंगळे, ममता कोल्हे, पृथ्वीराज सोनवणे, विजयकुमार गेही, गायत्री शिंदे, अनंत जोशी या सदस्यांचा समावेश आहे. महापालिकेच्या स्थायी सभेतून निवृत्त होणार्‍या सदस्यांनी आपल्या भावना सभागृहात मांडल्या. यावेळी पृथ्वीराज सोनवणे यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने अतिक्रमण, किरकोळ वसुली, मोबाईल टॉवर, आरोग्यबाबत सातत्याने बाजू मांडली. मात्र, प्रशासानाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप केला. सागर पार्क येथे किरकोळ वसुली विभागातून चूकीची कर आकारणी करण्याचा प्रश्‍न मागील स्थायी सभेत सोनवणे यांनी मांडला होता. याबाबात काय कारवाई केली याची विचारणा सोनवणे यांनी यावेळी केली. सभापती वर्षा खडके यांनी त्याचा रिपोर्टं आलेला नसल्याचे सभागृहास सांगितले. सोनवणे यांनी नगरसेवकांकडून चुकी झाली तर ऑडीट केले जाते, त्यास अपात्र ठरविले जाते परंतु, अधिकार्‍यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला. उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी देखील पडताळणी करण्यात येत असल्याचे सांगितले.

आरोग्य विभागाद्वारे जप्त केलेला प्लॅस्टीक बॅग्जस्चा साठा नष्ट करा
नगरसेवक पोटतिडकीने बोलत असतात परंतु, प्रशासन सुधारत नसल्याची खंत सोनवणे यांनी व्यक्त केली. आरोग्य विभागाकडून 11 टन प्लॅस्टीक बँगचा साठा जप्त करण्यात आल्याने कर्मचार्‍यांचा अभिनंदन सोनवणे यांनी केले. जप्त केलेला साठा सदस्यांना दाखविण्यात यावा अशी सूचना त्यांनी मांडून या साठ्याचे काय केले जाणार आहे याची विचारणा केली. याला उत्तर देतांना आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी हा साठा रिसायकलींगसाठी कारखान्याला देणार असल्याचे सांगितले. पृथ्वीराज सोनवणे यांनी आरोग्यअधिकारी डॉ. पाटील यांच्यावर अविश्‍वास दाखवत ते रिसायकलींग करणार नाहीत असे ठासून सांगितले. जप्त केलेल्या सर्व पिशव्या फाडायला हव्या होत्या अशी अपेक्षा व्यक्त केली. या पिशव्यांना चिरा मारा यात पैसे कमविण्याचा उद्देश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही कारवाई उपायुक्त खोसे यांनी स्वतः करावी अशी अपेक्षा सोनवणे यांनी व्यक्त केली. उपायुक्त खोसे यांनी रिसायकलींगला पिशव्या देण्यापेक्षा कट माराव्यात असे आदेश देवून सदस्यांनी माहिती मागितल्यास गोडावूनची माहिती देण्याचे सूचीत केले.

आरोग्य अधिकार्‍यांचे मोघम उत्तर
शहरात किरकोळ वसुली केवळ 25 टक्के दाखविली जात असतांना प्रत्यक्षात पिंप्राळा, शहर बाजारातून 4 पट वसूली होत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला. शहरात 314 डेंग्यू रूग्ण आढळले असून चिकनगुनीयाची साथ पसरली असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच यातून आरोग्य विभागाकडील सर्व आठ फवारणी मशीन वापरल्या जात आहे का असा प्रश्‍न उपस्थित केला. आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी आठही फवारणी मशीन सुरू असल्याचे सांगितले. यावर सोनवणे यांनी ही मशीन कोठे कोठे वापरले जात आहेत याची माहिती मागितली असता आरोग्य अधिकार्‍यांनी माहिती घ्यावी लागले असे मोघम उत्तर दिले. आरोग्य अधिकार्‍यांच्या उत्तराने सभापती वर्षा खडके ह्या संतप्त होत प्रत्येक सभेत माहिती घेतात अशा शब्दांत आरोग्यअधिकार्‍यांना खडसावले.

डेग्यूंबाबत जनजागृती करा
पृथ्वीराज सोनवणे यांनी आठ मशीन कोठे सुरू आहेत याचा पाठपुरावा केला असता आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी कर्मचार्‍यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावर नितीन बरडे यांनी त्यांना टोकत कर्मचारी तुमचा फोन उचलणार नाही असा टोला मारला. डॉ. रामलवानी यांनी डेग्यूंची स्पेशीफीक ट्रिटमेंट नसल्याची माहिती देवून जनजागृती हेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावर रूग्णांवर उपचारासाठी शाहू महाराज रूग्णालयात औषधी उपलब्ध करण्याचे आदेश सभापती खडके यांनी यावेळी दिलेत. उज्वला बेंडळे यांनी वार्डांत रूग्ण आढळण्याची वाट न पहाता अ‍ॅबेटिंक केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. अनंत जोशी यांनी 4 वर्षांपासून महासभा तसेच स्थायीत आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित करूनही कार्यवाही करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करत कॅरीबॅग्जस् जप्तीची कारवाई आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निर्बिजी-करणाबाबत चालढकल
शहरात कुत्र्यांचा त्रास वाढल्याने सदस्यांनी रोष व्यक्त करत त्यांचे निर्बजनीकरण करण्याची मागणी केली. यावळी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी 7 वेळा टेंडर काढूनही मक्तेदार आले नसल्याची माहिती दिली. यावर पृथ्वीराज सोनवणे यांनी 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा खर्च करता येईल का याबाबत शासनाकडे चाचपणी केली का अशी विचारणा डॉ. पाटील यांना केली असता त्यांनी असा कुठलाही पत्रव्यवहार शासनासोबत करण्यात आला नसल्याचे सांगितले. याबात उज्वला बेंडाळे यांनी देखील प्रश्‍न उपस्थित करत शहरात माणसांपेक्षा कुत्र्यांची संख्या जास्त असल्याची तक्रार केली.