डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडीच कोटी

0

पुणे । पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन न केल्याने शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ पसरली. या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक घरात जाऊन डेंग्यूची डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असून, या कामासाठी अडीच कोटींच्या निधीस स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी हा निधी उपलब्ध झाला असता तर कदाचित डेंग्यूच्या साथीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविता आले असते.

औषध फवारणी करून आणि पाणी साठ्याच्या जागा नष्ट करूनही शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ पसरली. यामुळे महापालिका हद्दीतील घराघरांत या आजाराने त्रस्त रुग्ण वाढत आहेत. शहरात जुलै महिन्यापासून डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाला. जानेवारी ते 25 ऑक्टोबरअखेर शहरात सुमारे 3 हजार 864 संशयित रुग्ण आढळून आले असून त्यातील 90 टक्के रुग्ण हे जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीतील आहेत. एका बाजूला ही साथ वाढत असतानाच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणार्‍या उपाययोजना अतिशय तोकड्या तसेच निकामी ठरल्या आहेत.

यंत्रणेचा अभाव
ही साथ रोखण्यासाठी प्रशासनाकडून शहरातील शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि पालिकेच्या इमारतींची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, संपूर्ण शहरात तपासणी करण्यासाठी पालिकेकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयांनी दिलेल्या अहवालावरून ज्या भागात डेंग्यूचेे रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागातील 100 घरांची तपासणी महापालिकेकडून केली जात आहे.

घराघरांची तपासणी
मात्र, ही साथ आटोक्यात येत नसल्याने आता घराघरांत जाऊन तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. घरोघरी जाऊन तपासणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांची आवश्यकता असून हे कर्मचारीही पालिकेकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून कर्मचारी उपलब्ध करून घेऊन ही तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी सुमारे अडीच कोटींचा खर्च येणार असून क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ही मोहीम राबविली जाणार आहे. स्थायी समितीने मंगळवारी या अडीच कोटींच्या निधीस मान्यता दिली.