डेंग्यू उत्पत्तीस्थाने असलेल्या 4 हजार सोसायट्यांना नोटीस

0

पुणे । पुणे शहर परिसरात वाढत्या शहरीकरणामुळे हवा, पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे साथीच्या रोगांनी शहरात थैमान घेतले असून गेल्या पाच वर्षांत शहरात डासांमुळे पसरणार्‍या रोगांमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोसायट्यांबरोबरच घरातील फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, कुंड्या यातून व तसेच रुग्णालये, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजावण्यात येत आहेत. शहरात आतापर्यंत साडेचार हजार नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

डासांची उत्पत्ती कमी होण्याची शक्यता
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात झाली. सध्या डेंग्यूचे 1200 रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. त्यापैकी 98 रुग्ण पुणे शहराच्या नजीकच्या परिसरातील आहेत. डेंग्यूला आळा बसावा याकरीता पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सध्या धूर फवारणी आणि औषध फवारणी करण्यात येत आहे. मात्र आता तापमानही कमी आहे, त्यामुळे डासांची उत्पत्तीही घटेल आणि पुढील आठ दिवसात काही प्रमाणात डासांची उत्पत्ती कमी होण्याची शक्यताही पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे.

ठिकठिकाणी धूर फवारणी
महापालिकेने डेंग्यू नियंत्रणासाठी ठोस पावले टाकली आहेत. मात्र, सातत्याने पडणारा पाऊस आणि बदलते वातावरण यामुळे मर्यादा पडत आहेत. पावसाने विश्रांती दिल्याने ठिकठिकाणी धूर फवारणी सुरू आहे. त्यामुळे लवकरच डासांची पैदास नियंत्रणात येईल अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकार्‍याने दिली.