३४८ नागरीकांमध्ये डेंग्यू सदृश्य लक्षणे : नऊ महिन्यांत ४२५ जणांना लागण
१०५ रुग्णांना डेंग्यूची लागण; आरोग्य विभागाची माहिती
चिकुनगुनीयाचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आढळले ६१ रूग्ण
पुणे । शहरात डेंग्युची साथ झपाट्याने वाढत चालली आहे. या साथीवर नियंत्रण मिळविण्यास पालिकेला अपयश येत असल्याचे समारे आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ३४८ नागरीकांमध्ये डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळली आहेत. तर त्यातील १०५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ४२५ रुग्णांना डेंग्यू झाला असल्याचे निदान झाले आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दिवसागणिक डेंग्यू व चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावरूनच पालिकेची यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याच्या प्रतिक्रीया नागरीकांकडून व्यक्त होत आहेत.
जुलैपासून रुग्णांमध्ये वाढ
शहरात प्रामुख्याने जुलै महिन्यापासून या साथीचे रूग्ण वाढलेले आहेत. महापालिकेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यात डेंग्यूचे ५८, जुलै महिन्यात २२८, ऑगस्ट महिन्यात ७८६, तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ३४८ संशयित रूग्ण आढळून आलेले आहेत. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत हा आकडा मोठा असून साथ आटोक्यात न आल्यास डेंग्यूची साथ गंभीर रूप धारण करण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
चिकुनगुनीयाही वाढला
डेंग्यू बरोबरच शहरात चिकुनगुनीयाचीही साथ पसरत आहे. जानेवारीपासून चिकुनगुनीयाची सुमारे ३०९ जणांना लागण झालेली आहे. त्यातील सुमारे १८१ रूग्ण ऑगस्ट महिन्यात आढळून आले असून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात ६१ रूग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
डासांची पैदास वाढली
साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरात औषध फवारणीसह डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती असलेली ठिकाणे नष्ट करीत आहे. परंतु अधूनमधून होणारा पाऊस आणि त्यानंतर पुन्हा वाढणारे तापमान यामुळे या डासांची पैदास वाढतच असल्याचे समोर आले आहे. शहरात दरवर्षी पावसाळ्यानंतर डेंग्यूची साथ मोठया प्रमाणात पसरते. त्यावर खबरादारीचा उपाय म्हणून पालिकेकडून यंत्रणा राबविली जात असली तरी यंदाच्या वर्षी ही साथ महापालिकेच्या हाताबाहेर गेल्याचे वास्तव आहे.
स्वाईन फ्लूचे ३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर
शहरातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सध्या ३५ रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. मागील काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत पुण्यात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पावसाळा, दमट वातावरण हे या विषाणूच्या प्रादुर्भावासाठी पोषक ठरत असल्याने या रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी महापालिकेने विविध रुग्णालयात ११२ रुग्णांचे स्क्रिनिंग केले. त्यापैकी ४ जणांना टॅमिफ्लू दिल्या. सध्या शहरातील विविध रुग्णालयात स्वाईन फ्लूयूचे ६१ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यातील ३५ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.