पुणे । संपूर्ण शहर डेंग्यूच्या विळख्यात सापडले आहे. महापालिका प्रशासनाने शहरात डेंग्यू निर्मूलन मोहीम सुरू केली होती. यावर अवकाळी पावसाने पाणी फिरविले आहे. पावसाळा संपताच महापालिकेने शहरातील सार्वजनिक ठिकाणे, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये पाणी साचलेल्या ठिकाणांमधील डासोत्पत्तीचे ठिकाणे नष्ट करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला होता. मात्र, अवकाळी पावसाने या सर्व ठिकाणांमध्ये पुन्हा पाणी साचल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, शहरातील डेंग्यूच्या संशयित रूग्णांचा आकडा 5 हजार 600 च्यावर पोहोचला आहे. त्यातील 1,446 रुग्णांना डेंग्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. जून 2017 पासून शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जून महिन्यात 56 रुग्ण आढळून आले होते. जुलै महिन्यात हा आकडा 228 वर गेला, तर ऑगस्टमध्ये 786, सप्टेंबरमध्ये 1,114 आणि ऑक्टोबरमध्ये 1,819 संशयीत रूग्ण आढळून आले आहेत.नोव्हेंबर महिन्यात आज अखेरपर्यंत 1,529 रुग्ण आढळून आले आहेत. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका उपाय योजना आखत असली तरी प्रशासनाला त्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वीच प्रशासनाने शहरातील प्रत्येक घरात जाऊन डेंग्यूच्या डासोत्पत्तीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 2 कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आली होती.
ठिकठिकाणी पाण्याची डबकी
सलग तीन दिवस शहरात अवकाळी पाऊस झाल्याने पुन्हा ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचलेली असून त्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागास नव्याने सार्वजनिक ठिकाणांवरील तसेच शासकीय कार्यालयांमधील पाणीसाठा पुन्हा नष्ट करावा लागणार असल्याने त्याचा फटका घरोघरी जाऊन डेंग्यू निर्मूलन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहीमेस बसणार आहेत.