डेपोतच बसचालकाला मारहाण

0

कात्रज । येथी जुन्या बसस्थानकात दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरून भांडणे झाली. या भांडणात दुचाकीचालकाने बस नियंत्रक आणि चालकाला मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अजिनाथ जगताप (वय 58, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अंबादास गवळी (45, रा.कात्रज) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बसस्थानक येथे जगताप हे नियंत्रक पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी (दि. 1) रात्री सव्वाआठच्या सुमारास अंबादास गवळी याने वाहतुकीला अडथळा येईल, अशा पद्धतीने बसडेपो येथे त्याची दुचाकी उभी केली होती. जगताप यांनी ती काढण्यास सांगितल्यानंतर गवळी याने त्याना शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यस्थी करीत असलेल्या बसचालक शिवाजी हणमंत घोलप (वय 40, रा. कात्रज) यांनाही गवळी यांनी मारहाण केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. यावेळी तेथील कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करत ही भांडणे सोडविली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.