डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून गंडवले

0

ठाणे । मोबाइलवर फोन करून बोलण्यात गुंतवून डेबिट कार्डची माहिती मिळवत एका अज्ञात भामट्याने लागोपाठ 8 जणांना मिळून सुमारे पावणे तीन लाखांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ऑनलाईन फसवणूकीचे गेल्या काही महिन्यांत शेकडो गुन्हे दाखल झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते.

33 हजारांची फसवणूक
डोंबिवलीनजीक असलेल्या ठाकुर्ली येथे पद्माकर कॉलनी अंकुर सोसायटीमध्ये राहणारे सत्यनारायणराव कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने फोन करत बँकेतून बोलत असल्याचे भासविले. तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगत त्यांच्याकडून कार्डची माहिती जाणून घेतली. त्यानंतर ऑनलाइन व्यवहार करत त्यांच्या बँक खात्यातून 33 हजार 489 रुपये काढून घेतले. सदर बाब कुलकर्णी यांच्या लक्षात येतच त्यांनी याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अशाच प्रकारे डोंबिवलीत राहणारे आयशा शेख, राजेंद्र यादव, अभय गायकवाड, भाईलाल देढीया, दत्ता तोलेदार, अनिता पडवळ, श्रीराम बागल आदींची फसवणूक केली. या सगळ्यांचे मिळून एकूण 2 लाख 40 हजार 266 हजार रुपये ऑनलाइनच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून काढून घेतले. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस तपास करी आहेत.