मुंबई : जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्राला दुसरे स्थान मिळाले आहे. बझनेट या संकेतस्थळाने घेतलेल्या सार्वमतानुसर बॉलीवूड आणि हॉलीवूडलाही आपल्या सौंदर्याने वेड लावणार्या प्रियांकाला सर्वाधिक मते मिळाली आहेत.
बेऑन्सला जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये प्रथम स्थान मिळाले आहे. प्रियांकाने अॅन्जोलिना जोली, एमा वॉट्सन, एमा स्टोन, मिशेल ओबामा, गिगी हॅदिद यांना मागे टाकून हे स्थान पटकावले. प्रियांकाने ट्विट करून तिचा आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत. हॉलीवूडमधील श्रीमंत अभिनेत्री ते टीव्ही जगतात सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री- हा प्रियांकाचा आलेख सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आहे. पण तिच्या या यशाकडे नीट पाहिले तर लक्षात येते की तिने विचारपूर्वक तिच्या करीअरबद्दल निर्णय घेतले आहेत. वयाची तिशी ओलंडल्यानंतर बॉलीवूडमध्ये करिअर अजून उंचावर नेणे तसे कठीण असते, याची तिला पूर्णपणे जाणीव होती. त्यामुळे योग्य संधी मिळाल्यावर तिने हॉलीवूडमध्ये झेप घेतली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने तिथेही आपल्या नावाचा दबदबा कायम राखला, असे विश्लेषक अतुल मोहन यांचे म्हणणे आहे.