डेबीट कार्ड ब्लॉक होण्याची धमकी देऊन फसवणुक

1

मुंबई – डेबीट कार्ड ब्लॉक होण्याची धमकी देत कार्डची गोपनीय माहिती काढून एका अज्ञात भामट्याने सुमारे 75 हजार रुपयांचा अपहार केल्याची घटना ट्रॉम्बे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

चंद्रकांत रामचंद्र पवार हे ट्रॉम्बे येथील अणुशक्तीनगर, न्यू मंडाळा, वसंत अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा एक बँकेत बचत खाते असून या बँकेचे त्यांच्याकडे एक डेबीट कार्ड आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना शर्मा नावाच्या एका व्यक्तीने फोन करुन आपण बँकेतून बोलत आहे. तुमचा डेबीट कार्ड ब्लॉक होणार आहे. कार्ड ब्लॉक होऊ नये म्हणून त्याने त्यांच्याकडे कार्डची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शर्मा हा बँकेचा अधिकारी असल्याचे समजून चंद्रकांत पवार यांनीही त्यांच्या कार्डची सर्व माहितीसह ओटीपी क्रमांक दिला होता. त्यानंतर काही वेळात या भामट्याने बोगस कार्डच्या आधारे त्यांच्या खात्यातून 75 हजार रुपयांचा अपहार केला होता. ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळवून नंतर ती एटीएमच्या मदतीने काढण्यात आली होती. हा प्रकार नंतर चंद्रकांत पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी ट्रॉम्बे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित भामट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. गेल्या काही महिन्यांत अशाच प्रकारे फसवणुक करणारी अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून या टोळ्यांनी आतापर्यंत अनेकांकडून कार्डविषयी माहिती काढून त्यांच्या पैशांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही काही लोक अशा भामट्यांच्या बोलण्यावर बळी पडत आहे.