डेर्‍यात तब्बल 600 सांगाडे!

0

सिरसा : दोन साध्वींवरील बलात्कारप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या गुरुमीत रामरहीम सिंग याच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहे. डेरा सच्चा सौदाच्या सिरसा येथील मुख्यालयामध्ये 600 मानवी सांगाडे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. डेरा सच्चा सौदाची अध्यक्ष विपश्यना इन्सा आणि उपाध्यक्ष डॉ. पी.आर नैन यांनी हरियाणा पोलिसांना ही माहिती दिली. मृत्यूनंतर डेरा सच्चा सौदाच्या परिसरात असणार्‍या शेतांमध्ये अस्थी पुरल्यास मोक्ष मिळतो, अशी रामरहीमच्या अनुयायांची अंधश्रद्धा आहे. त्यामुळे मुख्यालयाच्या परिसरातल्या शेतांमध्ये 600 लोकांचे सांगाडे आणि अस्थी आहेत, असे नैन याने पोलिसांच्या विशेष पथकाला सांगितले. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

ही तर डेरा सच्चा सौदाची जुनी परंपरा
बलात्कारी बाबा रामरहीमच्या काळ्या कृत्यांविरोधात वाचा फोडणार्‍या लोकांची हत्या करून त्यांचे मृतदेह डेरा परिसरातील शेतांमध्ये पुरल्याचा आरोप अनुयायी करत आहेत. मृतदेह पुरल्यानंतर त्यावर झाड लावले जायचे आणि त्याबाबत बोलण्यास कोणालाही सक्त मनाई केली जात असे. डेराचे हे रहस्य बाहेर येऊ नये यासाठी या भागात खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली होती, असा आरोपही अनुयायांनी केला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. डेराचे उपाध्यक्ष डॉ. पी. आर. नैन यांनी विशेष तपास पथकाला (एसआयटी) 300 लोकांची एक यादी सोपवली आहे. हे ते 300 लोक आहेत ज्यांच्या अस्थी (अंत्यसंस्कारांनंतर) डेराच्या शेतांमध्ये मोक्ष मिळण्याच्या इच्छेने पुरण्यात आली आहेत. एसआयटीचे प्रमुख कुलदीप बेनीवाल यांनी या यादीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डॉ. नैन यांनी चौकशीत डेर्‍यात 600 जणांच्या अस्थी आणि सांगाडे पुरलेले असल्याची माहिती दिली का हे विचारता मात्र बेनीवाल यांनी नकार दिला. बेनीवाल यांनी सोमवारी डेरा सच्चाचे अध्यक्ष विपश्यना आणि मंगळवारी डॉ. नैन यांना चौकशीसाठी बोलावले होते. या लोकांच्या नातेवाईकांनीच त्यांच्या अंत्यसंस्कारांनंतर अस्थी आणि राख डेराच्या शेतांमध्ये पसरून टाकण्यासाठी दिली, असा दावा करण्यात आला आहे. ही डेराची जुनी परंपरा आहे असे नैन यांनी सांगितले.