डेव्हिड वॉर्नर थोडक्यात बचावला

0

सिडनी । फलंदाजीचा सराव करताना खतरनाक बाऊन्सर मानेला लागल्यामुळे झालेल्या दुघटनेतून ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर थोडक्यात बचावला आहे. जोश हेजलवूडच्या एका खतरनाक बाऊन्सरवर तो जखमी झाला आहे.

हेजलवूडच्या बाऊन्सरवर वॉर्नरने जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न केला पण चेंडूच्या उसळीचा त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू थेट त्याच्या मानेवर जाऊन आदळला आणि वॉर्नर खाली कोसळला.त्यावेळी स्लीपमध्ये उभा असलेला स्टिव्ह स्मिथ मदतीसाठी धावला आणि डॉक्टरही मैदानात पोहोचले. त्यानंतर 30 वर्षाच्या वॉर्नरला मैदान सोडावं लागलं. पुन्हा तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही. पण सुदैवानं वॉर्नरची दुखापत गंभीर नसल्याची माहिती आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यासाठीची तयारी म्हणून स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या संघांमध्ये सराव सामना सुरू होता. शुक्रवारी कांगारूंचा संघ बांगलादेश दौर्‍यासाठी रवाना होणार आहे. ढाकामध्ये 27 ऑगस्ट रोजी दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. दरम्यान, गंभीर दुखापत नसल्यामुळे वॉर्नर या दौर्‍यावर जाणार असल्याची माहिती आहे. फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतर त्याला दौर्‍यावर जाण्याची परवानगी मिळाली आहे.