एडमंटन । करो या मरो अशा स्थितीतल्या सामन्यात रामकुमार रामनाथन पराभूत झाल्यामुळे भारताला पुन्हा एकदा डेव्हिस चषक स्पर्धेत आशियाई विभागीय लढतींना सामोरे जावे लागणार आहे. दुसरीकडे डेनिस शापोवालोव्हने कॅनडाला 3-2 असे विजयी करत परत एकदा एलिट डेव्हिस चषक जागतिक गटात स्थान मिळवून दिले आहे.लढतीच्या शेवटच्या दिवशी रामकुमार रामनाथनकडून चमत्काराची आशा होती. पण, त्याला मिळालेल्या संधीचा फायदा न उचलता आल्यामुळे क्रमवारीत 51 व्या स्थानावर असलेल्या शापोवालोव्हने 6-3, 7-6, 6-3 अशा विजयासह कॅनडाला 3-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. या लढतीनंतर झालेल्या परतीच्या दुसर्या एकेरी सामन्यात युकीने ब्रँडन शनूरला 6-4, 4-6,6-4 असे हरवले. पण हा विजय मिळवूनसुद्धा इनडोअर कोर्टवर खेळवण्यात आलेल्या जागतिक प्ले ऑफ गटाच्या लढतीत भारताला 2-3 असा पराभव पत्कारावा लागला. दोलायामान स्थिती असलेल्या या सामन्यातील निर्णायक सेटमध्ये सुरुवातीच्या पिछाडीनंतर युकीने पाचव्या मॅचपॉइंटवर विजय निश्चित केला.
या पराभवामुळे सलग चौथ्यांदा भारताला प्ले ऑफचा अडथळा पार करण्यात अपयश आले. मागील तीन प्रयत्नांमध्ये भारताला सर्बिया, झेक प्रजासत्ताक आणि स्पेनकडून पराभव पत्कारायला लागले होते. कॅनडाने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनकडून मिळालेल्या पराभवानंतर 16 देशांचा समावेश असलेल्या जागतिक गटात स्थान मिळवले होते. जागतिक प्ले ऑफ गटात पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी भारताला आता 2018 मध्ये आशिया ओशियाना गट एक मध्ये खेळावे लागणार आहे.