डॉक्टरला मारहाणीचा आरोप असणार्‍याची आत्महत्या

0

धुळे । धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरला मारहाण केल्या प्रकरणी संशयीत आरोपीने शहर पोलीस स्थानकात आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संशयीत प्रदीप सदाशिव वेताळ याने शहर पोलीस स्थानकातील शौचालयात गळफास घऊन आत्महत्या केली. हा अतिशय गंभीर प्रकार असल्याने या प्रकरणाचा तपास सी आय डी कडे वर्ग करण्यात येणार आहे. डॉक्टरला मारहाण प्रकरणातील आरोपी होता. शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत.

प्रभारी अधिकारी व ड्युटीवरील कर्मचार्‍यांवर प्रकरण शेकले जाण्याची चर्चा आहे. प्रदिपच्या आत्महत्येनंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलीस स्थानकात ठिय्या मांडला होता. तर महिलांचा आक्रोशाने पोलीस ठाण्यातील संपुर्ण वातावरण सुन्न झाले होते.

डॉक्टरला बेदम मारहाण
या सर्व प्रकाराला रविवारी रात्री प्रारंभ झाला. धुळे शहरातील सर्वोपचार रूग्णालयात साक्री मार्गावर जखमी झालेल्या एका रूग्णाला आणण्यात आले होते. त्या ठिकाणी डॉ. रोहन म्हामुणकर या निवासी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरने संबंधीत रुग्णाला न्यूरो सर्जनची आवश्यकता असल्याचं संगीतले. मात्र रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याने आणि डॉक्टरांशी शब्दीक चकमक झाल्याने चिडलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉ म्हामुणकर यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी 25 पेक्षा अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी 9 जण अटकेत आहेत. यातच प्रदीप सदाशिव वेताळ या तरूणाचा समावेश होता. त्याला अटक केल्यानंतर तो अस्वस्थ होता. यातूनच त्याने आत्मघाताचे पाऊल उचलले. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आधी डॉ. रोहन म्हामुणकर यांना झालेल्या बेदम मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. यानंतर आत्महत्येचे वृत्त आल्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत पोलीसात कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.