मांत्रिकाच्या मदतीने महिलेवर उपचाराचे प्रकरण
डॉ. सतीश चव्हाणांस मांत्रिकावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
पुणे : मांत्रिकाच्या मदतीने महिलेवर उपचार करणार्या डॉ. सतीश चव्हाणांविरोधात पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिदक्षता विभागात महिला रूग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरनेच मांत्रिक बोलावल्याची धक्कादायक घटना येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी घडली होती. संबंधित महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने नातेवाईकांनीच एका व्हिडिओद्वारे हा प्रकार समोर आणला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत होता. या प्रकरणी डॉ. सतीश चव्हाण यांच्यासह मांत्रिकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावाने फिर्याद दाखल केली
संध्या सोनवणे (24) यांच्यावर स्वारगेट येथील डॉ. सतीश चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये स्तनाच्या गाठीवर उपचार सुरू होते. त्यांना 20 फेब्रुवारीला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे डॉ. चव्हाणसुद्धा तपासणीसाठी येत असत. संध्या यांची तब्येत जास्तच बिघडल्याने डॉ. चव्हाण यांनी मांत्रिकाला बोलावून उतारा काढला होता. हा प्रकार महिलेच्या नातेवाइकांनी कॅमेर्यात चित्रित केला. संध्या यांचे भाऊ महेश जगताप यांनी सांगितले की, डॉ. चव्हाण यांनी कोणतीही परवानगी न घेता मांत्रिकाला बोलावले. त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेत माझ्या बहिणीला जीव गमवावा लागला. महेश जगताप यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डॉक्टरची पोलिस संरक्षणाची मागणी
धमकीचे फोन येत असल्याचे सांगून डॉ. चव्हाण यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान, संध्या सोनवणे यांना तपासत असताना एक पुजारी हजर होता, असे डॉ. सतीश चव्हाण यांनी पोलिसांकडे कबूल केले आहे. यासंदर्भात दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी डॉ. चव्हाण आणि रूग्णालयाची बाजू मांडताना म्हटले की, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह वा मंत्र-तंत्राचा प्रकार आढळला नाही. हॉस्पिटलमध्ये मांत्रिकाला प्रवेश दिला जात नाही. नातेवाईक म्हणून रुग्णाला कुणीही भेटायला येऊ शकतात.