वरणगाव। येथील रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने दररोजच्या कामकाजावर परिणाम झाला असून दुपारनंतर आलेल्या रूग्णांना थेट खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. रूग्णालयात एकच वैद्यकीय अधिकारी असतांना डॉ. हर्षल चांदा यांना कार्यमुक्त केलेच कसे, असा प्रश्न आता निर्माण होत आहे तर दुसरीकडे सात दिवसात डॉक्टरांची नियुक्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आला आहे.
खाजगी रुग्णालयाचा घ्यावा लागतो आधार
येथील रूग्णालयात चार वैद्यकीय अधिकार्यांची पदे मंजुर आहेत. मात्र या ठिकाणी अनेक दिवसांपासून एक वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा कार्यरत आहे. मध्यंतरीच्या काळात ते सुट्टीवर असताना वैद्यकीय अधिकार्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी भाजपचे गटनेते सुनिल काळे व मिलींद मेढे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी तात्पुरत्या स्वरूपात दोन शिकाऊ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर डॉ. हर्षल चांदा हजर झाल्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यालयी बोलावण्यात आले होते. आता पुन्हा डॉ. हर्षल चांदा यांची बदली जामनेर येथे करण्यात आली. त्यावेळेसपासून वरणगाव रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी नाही. यामुळे दुपारी बारा वाजेनंतर आलेले रूग्ण वार्यावर असतात तर काहींना तात्काळ उपचार मिळत नसल्याने खाजगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांना कार्यमुक्त केलेच कसा असा प्रश्न देखील निर्माण होत आहे.
शालेय पोषण वैद्यकीय पथकाची मदत
रूगणालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने शालेय पोषण आहार विभागातील सहा वैद्यकीय अधिकार्यांची मदत घेतली जात आहे. सकाळी 8 ते 12 यावेळेत ओपीडी काढण्यासाठी प्रत्येक डॉक्टरांना एक दिवस काम करावे लागत आहे. मात्र यानंतर डॉक्टर उपलब्ध नसल्याने रूग्णालय वार्यांवर असते. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास मृत नातेवाईकांना मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. मुक्ताईनगर येथुन वैद्यकीय अधिकारी आल्यानंतरच शवविच्छेदन होत असते. यामुळे नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी प्रतिक्षा करावी लागते.
तज्ञ डॉक्टरांची उणीव
रूग्णालयात चार वैद्यकीय अध्किार्यांची पदे मंजुर आहेत. यामधे विविध तज्ञ डॉक्टरांची पदे आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथे एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने विविध तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती होत नाही. पर्यायाने रूग्णांना योग्य निदान व उपचारापासून मुकावे लागते.
स्थानिक राजकीय पुढार्यांची उदासिनता
येथे रूग्णालय निर्मीती पासूनच वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता आहे. येथील दवाखान्यात बाहेरील वैद्यकीय अधिकारी येण्यास तयार नाही. याबाबत नेमके गमक काय याचा प्रश्न देखील सर्वांनाच पडला आहे. तसेच पुढार्यांनी देखील गोरगरीबांना चांगले उपचारासाठी एकत्र प्रयत्न करून वैद्यकीय अधिकारीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरातील रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरीकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराअध्यक्ष संतोष माळी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र देवून सात दिवसात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. बसस्थानक चौकात आमरण उपोषणाला बसणार.