डॉक्टरांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्टर सध्या संपावर आहेत. गेल्या सात दिवसात डॉक्टरांवरील हल्ल्याच्या तीन घटना घडल्या. धुळे, नाशिक आणि मुंबई. डॉक्टरांनी हल्ल्यांच्याविरोधात भूमिका घेणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. दुसऱ्यांच्या जीवनाच्या रक्षणासाठी आरोग्यसेवेचे व्रत घेतलेल्या डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय व्यावसायिकांवर असे हल्ले करणे म्हणजे त्यांचेच जीवन धोक्यात आणणे.
सततच्या हल्ल्यांनंतर निवासी डॉक्टरांचा संयम संपला. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. त्याबद्दल त्यांना अगदीच दोष देता येत नाही. त्यांनी तरी काय करावे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तसा केला जातही असतो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून नैमितिक रजेच्या बुरख्याआड राज्यातील सर्वच निवासी डॉक्टर संपावर गेल्याने आरोग्य सेवाच आजारी पडली आहे. रुग्णांचे खूप हाल होत आहेत. काहींच्या तर प्राणावरही बेतू शकेल. तरीही निवासी डॉक्टर सुट्टीवरच आहेत. त्यामुळेच बहुधा आज न्यायालयाने त्यांना फटकारलेही आहे.
वैदयकीय व्यवसाय हा एक पवित्र पेशा मानला जातो. डॉक्टरांनी कामगारांप्रमाणे वर्तन करणे डॉक्टरांना शोभणारे नसून हे वर्तन डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारे आहे, असे न्यायालयाने सुनावले आहे. तसेच मारहाणीची एवढीच भीती वाटत असेल तर अशा डॉक्टरांनी नोकरी सोडावी, अशा कडक शब्दांत उच्च न्यायालयाने आंदोलक डॉक्टरांना फटकारलेही आहे. तसे करतानाच जर हे डॉक्टर कामावर परतत नसतील तर त्यांच्यावर रुग्णालय व्यवस्थापनाने कारवाई करावीच. त्याचबरोबर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दलही त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
डॉक्टरही एखाद्या कामगाराप्रमाणे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर संपाचं हत्यार उपसत असेल ते गैरच आहे. तसेच त्यांचं वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारं आहे, असेही न्यायालयाने म्हटले. सामूहिक रजेवर जाण्याचा डॉक्टरांना हक्क आहे. मात्र अशाप्रकारे रुग्णांना वेठीस धरुन मागण्या पूर्ण करुन घेणे चुकीचं असल्याचे मतही न्यायालयानं व्यक्त केले.
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या विरोधात कडक कारवाईची तरतुद असतानाही हल्ले का वाढत आहेत? याचा गंभीर विचार प्रत्येकानेच करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने म्हणजे त्यात डॉक्टरही आले. खरेतर डॉक्टरांनीच जास्त विचार करणे आता आवश्यक आहे.
उपचार सुरु असताना रुग्ण दगावूही शकतो. आम्ही तर जीव ओतून उपचार करत असतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तरीही एखादा रुग्ण दगावला तर आमचा दोष काय? हा डॉक्टरांचा प्रश्न तसा रास्तच. डॉक्टरच काय कुणावरही हल्ला करण्याचा अधिकार कोणाला असूच शकत नाही. नाहीच आहे. मात्र तरीही रुग्णाच्या मृत्यूनंतर शोकसंतप्त नातेवाईक शोक बाजुला ठेऊन आधी संतापच व्यक्त का करतात तेही पाहिले पाहिजे. आपल्या येथील सार्वजनिक आरोग्य सेवांशी ज्यांचा थेट परिचय आहे त्यांना त्याचे कारण कळू शकेल.
आजही समाजातील एका मोठ्या वर्गासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यावश्यक आहेत. सार्वजनिक आरोग्य केंद्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून, जिल्हा रुग्णालये, महापालिका, नगरपालिकांची रुग्णालये ही सारी ठिकाणे सर्वसामान्यांसाठी मोठा आधार असतात. कोणत्याही सरकारी, मनपाच्या रुग्णालयात गेले तर तेथे दिसणारी गर्दी लोकांची गरज दाखवत असते. त्यामुळे तेथे रुग्ण मोठ्या आशेने गर्दी करत असतात. खरेतर हा वर्ग तो वर्ग असतो जो आजही डॉक्टरांना जणू देवच मानतो. आपल्यावर, आपल्या कुटुंबीयांवर कोसळलेले अनारोग्याचे संकट हा देवच दूर करेल अशा विश्वासातून हा वर्ग डॉक्टरांकडे पाहतो.
प्रत्यक्षात या रुग्णालयांमध्ये चाललेले काम अगदीच दर्जाहीन असते असेही नाही. मोठ्या संख्येने कर्मचारी चांगले कामही करतात. डॉक्टर वेळेची पर्वा न करता कर्तव्य बजावताना दिसतात. एक वेगळी व्रतस्थ निष्ठा असते असे म्हटले तरी चुकीचे नाही.
व्रतस्थ निष्ठा एकीकडे तर कामाला ओझे समझणारा दुसरीकडे. हा एक मोठा वर्ग असाही असतो जो केवळ करायचे म्हणून काम करताना दिसतो. येणारा प्रत्येक रुग्ण म्हणजे रुग्णसेवेची संधी म्हणून न पाहता काम वाढवणारी ब्याद म्हणून पाहिले जाते. मग स्वाभाविकच रुग्णांना योग्य प्रकारे न वागवणे, हिडीस-फिडीस करणे चालते. काहीवेळा तर एखादा अत्यवस्थ रुग्णाला घेऊन पोहचले की नातेवाईकांना वेगळेच अनुभवही येतात. त्यांचा जीव जळत असतो लवकर उपचारासाठी आणि रुग्णालयांमधील कर्मचारी हट्ट धरत असतो सर्व सोपस्कारांच्या पुर्ततेचा. वैद्यकीय भाषेत ज्याला गोल्डन अव्हर म्हटले जाते ती ही सुरुवातीची मौल्यवान वेळ असते. तिच जर वाया गेली तर संबंधीत रुग्णाच्या जीवाला धोकाही पोहचू शकतो. आपल्या नजरेसमोर जर हेळसांड होताना दिसली आणि मग मृत्यूनंतर शोकसंतप्त नातेवाईकांनी शोक बाजुला ठेवत आधी संताप व्यक्त केला तर दोषी तरी कोणाला म्हणायचे?
अर्थात पुन्हा तोच मुद्दा. दोष कोणाचा या पेक्षाही हे टाळता कसे येईल त्यावर विचार आवश्यक आहे. केवळ कायद्यांनी काही होणार नाही. रुग्ण आणि डॉक्टरांचे नाते हे भक्त – देवाचे. ते बिघडू नये याची दक्षता सर्वच पातळ्यांवरुन घेतली जावी. त्यासाठी मार्डसारख्या संघटनांनी केवळ संपाची घोषणा करणारे धमकवणारे माध्यम न बनता आपल्या काही सदस्य डॉक्टरांच्या मानसिकतेतही बदल घडवणारा इलाज करणे अत्यावश्यक आहे. डॉक्टरांवरचा हा इलाजही अत्यावश्यतच!