कुटुंबीयांचा आरोप ; खासगी रुग्णालयात गोंधळ
जळगाव: एरंडोल तालुक्यातील विखरण येथील दहावीतील विद्यार्थी ताप व डोकेदुखीने त्रस्थ असल्यामुळे त्याला जळगावातील इंडो हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप या मुलाच्या कुटुंबियांनी केल्याने रुग्णालयात गोंधळ झाला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता.
पवन शरद कोळी (वय 16) डोकेदुखी व तापामुळे अस्वस्थ होता. त्यामुळे कुटुंबियांनी बुधवारी दुपारी 12.30 वाजता त्याला जळगावातील इंडो अमेरीकन हॉस्पीटलमध्ये दाखल केलेे. डॉक्टरांनी त्याला दोन इंजेक्शन दिली. काही मिनीटातच त्याच्या शरीराच्या हालचाली थांबल्या. यानंतर सीटीस्कॅन करण्यासाठी त्याला शिवम सीटीस्कॅन सेंटरमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्याला शिवम सीटीस्कॅन सेंटरला नेले. सीटीस्कॅन करण्यापूर्वी पवनला तपासले असता तो मृत झाल्याचे वडिलांना सांगीतले.
एकुलता एक होता मुलगा
पवनच्या मृत्यूची माहिती कळताच कुटुंबिय, नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. दहावीच्या वर्गात शिकणारा पवन हा कोळी दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे नातेवाईकांचाही तो लाडका होता. त्याच्या अचानक जाण्यामुळे कोळी कुटुंबियांसह नातेवाईकांना धक्का बसला. त्याच्या मृत्यूनंतर आईने प्रचंड आक्रोश केला. इंडो अमेरीकन हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळेच पवनचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी रुग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला.