डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू

नातेवाईकांचा आरोप, दवाखान्यात गोंधळ

जळगाव- पांडे डेअरी चौक परिसरातील श्री गजानन हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे चावदस शंकर ताडे (वय ५५, रा.शिरसोली प्र.न.) या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना केला. डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी दवाखान्यात रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गोंधळ घातला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हापेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले. तर रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप चुकीचे आहे. ह्दयक्रिया बंद पडल्याने रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती ह्दयविकार तज्ज्ञ डॉ.विवेक चौधरी यांनी दिली.
शिरसोली प्र.न.येथील चावदस शंकर ताडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ११ एप्रिल रोजी आशिर्वाद यॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मोठ्या व्हॅटीलेटरची गरज होती. त्यासाठी आशिर्वाद हॉस्पिलमधील डॉक्टरांनी रुग्णास श्री गजानन हार्ट हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाईकांनी रुग्णास शनिवारी सायंकाळी ७ वाजता श्री गजानन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्ण रविवारी सकाळी नातेवाईकांशी बोलले. त्यांनी नातेवाईकांना चहा मागितली. तसेच नातीला भेटीसाठी घेवून या, असा निरोप दिला. या वेळी ते चांगले बोलत होते. यानंतर दुपारी १.२० वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हाय पॉवरचे चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप मयत चावदस ताडे यांचे भाऊ आणि शिरसोली येथील उपसरपंच श्रावण शंकर ताडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. याप्रसंगी नातेवाईकांनी दवाखान्यात गोंधळ घातला. ही परिस्थिती जिल्हापेठ पोलिसांनी नियंत्रणात आणली.
रुग्ण अगोदरच गंभीर
रुग्णाची प्रकृती अगोदरच गंभीर होती. रुग्णावर १४ दिवस दुसर्‍या दवाखान्यात उपचार झाले. कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर रुग्णास श्री गजानन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शिप्ट करताना रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर झालेली होती. मात्र, तब्बेत नियंत्रणात आणण्यात आली. या रुग्णास चुकीचे इंजेक्शन दिलेले नाही. तेच इंजेक्शन रात्री सुद्धा दिले होते. इंजेक्शनमुळे रिअ‍ॅक्शन आली असती, तर ती रात्री त्याच वेळी आली असती. रुग्णाची ह्दयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला. रुग्ण सेवेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही. रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप चुकीचे आहे, असे डॉ.विवेक चौधरी यांनी सांगितले.