भुसावळ। धुळे येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येथील आयएमए संघटनेतर्फे गुरुवार 23 रोजी सकाळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात येवून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच हल्लेखोरांना अटक होण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारण्याचा इशारादेखील संघटनेतर्फे देण्यात आला आहे. धुळे येथे 12 मार्च रोजी काही कारणानिमित्त डॉक्टरांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या निषेधार्थ मुंबई आझाद मैदान येथे आयएमएतर्फे निषेध रॅली काढण्यात आल्यानंतर संघटनेला वैद्यकीय क्षेत्रातील 12 संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
आयएमएतर्फे प्रांताधिकार्यांना आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले असून यात नमूद करण्यात आले की, गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने सरकारी दवाखाने व मेडिकल कॉलेज यांच्या सुरक्षिततेची जे निष्कर्ष दिले होते त्यांचे अद्यापही शासनाकडून पालन झालेले नाही. जर तसेच हल्ले डॉक्टरांवर होत राहिल्यास डॉक्टर गंभीर रुग्णांची सेवा करायला धजावणार नाही, अशी भितीदेखील आयएमएतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
प्रांताधिकार्यांना दिले निवेदन
डॉक्टर व रुग्णालय कर्मचार्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलण्यात यावी, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी, शिक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी व सर्व सरकारी रुग्णालयातील कर्मचार्यांवर दाखल करण्यात आलेेले गुन्हे तातडीने रद्द करण्यात यावे व त्यांना त्यांची पदे व वेतन पुर्ववत देण्यात यावे, धुळे येथील हल्लेखोरांना अटक करुन कारवाई करणे व त्यासाठी स्वतंत्र जलदगती न्यायालय स्थापन करणे, डॉक्टर सुरक्षा विषयक कायदा 2010 चे व्यवस्थित पालन करण्यात यावे, डॉक्टरांच्या सुरक्षिततेविषयीचा डागा कमिटीचा अहवाल वेळेत दाखल करुन त्यानुसार तातडीची कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या निवेदनावर भुसावळ विभागाचे अध्यक्ष डॉ. दिपक जावळे, सचिव डॉ. मिलींद पाटील, खजिनदार डॉ. प्रसन्न जावळे यांच्या स्वाक्षर्या आहे.
वरणगाव येथे डॉक्टरांनी केले काळ्या फिती लावून कामकाज
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वरणगाव मेडिकल असोसिएशनतर्फे निषेध करण्यात आला. रुग्णांचे हित लक्षात घेता काम बंद न ठेवता काळ्या फिती लावून रुग्णसेवा करण्यात आली. तसेच डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले लक्षात घेता शासनाने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.