जळगाव। शहरातील लॉ कॉलजच्या मैदानावर मंगळवारी रात्री 12.45 ते 1 वाजेच्या सुमारास अज्ञात तरूणांनी डॉक्टराच्या गळ्यातून तीन तोळ्याची सोनसाखळी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, रात्री डॉक्टर व चोरट्यांमध्ये झटापटी झाल्यामुळे डॉक्टराच्या गळ्याला इजा झाली आहे. महाबळ परिसरातील देवेंद्रनगरातील दंतरोग तज्ज्ञ डॉ. श्रीधर चंद्रशेखर त्रिपाठी (वय 24) हे मंगळवारी 12.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते. परंतू नेहरू चौकातच दुचाकीचे पेट्रोल संपल्याने त्यांनी आणलेल्या त्यांच्या मित्राची दुचाकी मनपा इमारती समोरील एका दुकानाच्या बाजुला लावून ते रेल्वेस्थानकात गेले. नातेवाईकांना सोडल्यानंतर ते रिक्षा शोधत होते. रात्रीची वेळ असल्याने रिक्षा चालक अव्वाच्या सव्वा भाडे सांगत होते. त्यामुळे ते डॉक्टर रिक्षात बसले नाही.
दुचाकी चालकाने विचारले…
काहीवेळ रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर 12.45 वाजता एक काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या तरूणाने डॉ. त्रिपाठी यांना विचारले कुठे जायचे आहे. त्यांनी देवेंद्रनगर सांगितल्यानंतर शिवकॉलनीला चाललो असल्याचे सांगून दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्या तरूणाने त्याचे नाव तुषार पाटील असल्याचे सांगून शिवकॉलनीत राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर बसस्थानकाजवळ त्या तरूणाने सिगारेट पिण्यासाठी दुचाकी थांबविली.
‘आई मी येतोय’चा कोडवर्ड…
सिगारेट पित असताना त्या तरूणाला मोबाइलवर एक फोन आला. त्याने आई मी येतोय रस्त्यातच असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या तरूणाने दुचाकी नुतनमराठा महाविद्यालयाच्या मागच्या गल्लीतून टाकली. त्यावेळी डॉ. त्रिपाठी यांनी त्याला स्वातंत्र्य चौकाकडून दुचाकी घेऊन जाण्यास सांगितली. मात्र त्याने ऐकले नाही. बाहेती महाविद्यालयाकडून मनियार लॉ कॉलेजच्या मैदानावर त्याने मधोमध दुचाकी थांबविली. डॉ. त्रिपाठी यांना शंका आली. त्यांनी त्याला विचारले असता. त्याने एक सिगारेट पिऊन पुढे जाऊ असे सांगून माचीस मागितली. मात्र माचीस नसल्याने त्याने दुचाकीच्या लाइटमध्ये मैदाना माचीस शोधण्याचा बनाव केला. काही वेळानंतर बाहेती महाविद्यालयाकडून दोन तरूण त्या ठिकाणी आले. त्यापैकी एक डॉ. त्रिपाठी यांच्याजवळ आला. तर दुसरा त्या तरूणाजवळ जाऊन गप्पा मारत होता. डॉ. त्रिपाठी यांना त्याने विचारपूस केल्यानंतर त्यांच्याशी झटापट करण्यास सुरूवात केली. हाणमारी केल्यानंतर त्याने डॉ. त्रिपाठी यांच्या गळ्यातील सोनसाखळीला जोरात हिसका दिला. मात्र एक प्रयत्नात सोनसाखळी न तुटल्याने त्याने दोन, तीन वेळा हिसकली. डॉ. त्रिपाठी यांच्या गळ्याला जखमाही झाल्या. त्यांनी आरडा ओरड केली.
मात्र रात्रीची वेळ असल्याने कोणीही मदतीला आले नाही. त्यानंतर दुचाकीस्वार महामार्गाच्या दिशेने निघून गेला. तर दोघे चोरट्यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून पोबारा केला. डॉ. त्रिपाठी यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यानंतर डॉ. त्रिपाठी यांनी आयएमआर महाविद्यालयाजवळ राहत असलेल्या त्यांच्या मित्राच्या खोलीवर जाऊन हा प्रकार सांगितला. त्यांनी रात्री 2 वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेतली. मात्र घटनास्थळ जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाऊन दिलेल्या तक्रारीवरून जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.