डॉक्टर आत्महत्येप्रकरणी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन

0

भुसावळसह यावलमध्ये प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा

भुसावळ- डॉ.पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषी डॉक्टरांवर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी भुसावळसह यावलमधील संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिले असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. भायखळा येथील नायर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी असलेल्या डॉ.पायलने सहकारी तीन विद्यार्थिनीच्या रॅगींगला कंटाळून आत्महतम्या केली होती. या प्रकरणी यावलमधील आदिवासी तडवी भिल्ल एकता संघासह भुसावळातील शिवसेनेसह अन्य संस्था, संघटनांतर्फे सोमवारी तहसीलदार व प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

कठोर कारवाई करण्याची मागणी
राहत फाउंडेशनच्या अध्यक्षा फिरोज तडवी, नुरजहॉ तडवी यांनी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना दिलेल्या निवेदनानुसार नायर महाविद्यालयातील स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून शिक्षण घेणार्‍या डॉ.पायल तडवी यांनी सहकारी डॉ.हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेर, डॉ.अंकिता खंडेलवाल यांनी मानसिक त्रास दिल्याने त्यांनी आत्महत्या केल्याने तिघाही दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

भुसावळातील विविध संस्थांनी दिले निवेदन
डॉ.पायल तडवी यांना रॅगिंग व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विविध संस्थांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी महाकालेश्वर मंडळाचे तुजितसिंग चौधरी, जीवन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आसेम आदिवासी सेवा मंडळातर्फे फिरोज तडवी, मोहसीन तडवी, युनूस तडवी प्रशांत बोडके, अनवर तडवी, सरकराम तडवी, शेखर तडवी, फकीरा तडवी, शोएब तडवी, इकबाल तडवी, भू्षण महाजन आदींच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन देण्यात आले. भुसावळ शिवसेना व दिव्यांग सेनेच्यावतीने विनोद गायकवाड यांनी निवेदन दिले.

यावलमध्ये आंदोलनाचा इशारा
यावल- डॉ.पायल तडवी यांनी रॅगिंगच्या छळाला कंटाळून केलेल्या आत्महत्येप्रकरणी पसार असलेल्या तिघाही सहकार्‍यांनी तातडीने अटक होवून त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आदिवासी तडवी भिल्ल एकता संघाचे महाराष्ट्र राज्यायक्ष एम.बी.तडवी यांनी दिला आहे.