डॉक्टर गिबसन स्मारकाची दुरवस्था

0

भंगार ठेवण्यासाठी स्मारकाच्या जागेचा वापर : स्वच्छता कर्मचार्‍याअभावी कचर्‍याचे साम्राज्य

नारायणगाव । भारताचे पहिले वनसंरक्षक म्हणून डॉक्टर अलेक्झांडर गिबसन 22 मार्च 1847 रोजी नियुक्त झाले होते. भारतात वनशास्त्राचा मुलभूत पाया रोवुन वनस्पती शास्त्रज्ञ व वनशास्त्रज्ञ अशी त्यांनी चोख कामगिरी बजावली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जुन्नर तालुक्यातील कारखाना फाटा ते येडगाव रोडच्या आतील रस्त्यावर गिबसन गार्डन आणि त्यात त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. या वास्तुची मोठी दुरवस्था झाल्याची माहिती अ‍ॅन्टी करप्शन कौन्सिल ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदिल शेख यांनी दिली.

स्मारकाची पडझड
याठिकाणी कुंपण घालून डॉ. गिसबन यांचे निवासस्थान, त्यांचे स्मारक बांधलेले आहे. 1869 साली गिबसन यांच्या मृत्यूनंतर ते वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले. परंतु वनविभागाने सध्या या स्मारकाच्या जागेचा उपयोग भंगार ठेवण्याची जागा म्हणून केलेला दिसत आहे. याठिकाणी खराब झालेले वाघाचे पिंजरे, टाकाऊ सामान अस्ताव्यस्त टाकलेले आहे. स्मारकावर झाड उगवले आहे, काही पडझड झाली आहे. याठिकाणी असलेली झाडे सुकलेली आहेत. तसेच स्वच्छता कर्मचार्‍याअभावी या ऐतिहासीक वास्तूमध्ये पालापाचोळा साचल्याचे दिसत आहे.

पिंजर्‍यांचा होणार लिलाव
याविषयी वनक्षेत्रपाल पिसाळ यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. तसेच याविषयी सध्या याठिकाणचा कार्यभार पाहणार्‍या वनपाल मनिषा काळे यांना संपर्क केला असता याठिकाणी पुर्णवेळ कर्मचारी नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच याठिकाण ठेवलेल्या खराब पिंजर्‍याचा लिलाव करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु काळे यांच्याकडे आधीच अनेक गावांचा कार्यभार आल्याने त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही.

स्मारकाच्या दुरुस्तीची मागणी
जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाचे ठिकाण आणि वनप्रेमी व वनसंशोधकांसाठी एक प्रेरणास्थान असलेल्या स्मारकाची दुरावस्था पाहता वनविभागाने त्वरित याकडे लक्ष देऊन स्वच्छता व देखरेख करण्यासाठी पुर्णवेळ कर्मचारी नेमण्याची गरज युवा शक्ती फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेने व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक पर्यटक तेथे येऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात व तालुक्याचे वैभव अजुन संपन्न होऊ शकते.

लवकरच पूर्णवेळ कर्मचारी
गेल्या वर्षी शंभर वनमजूर निवृत्त झाल्याने त्याठिकाणी पुर्णवेळ कर्मचारी अजून नियुक्त केलेला नाही. त्याठिकाणी पर्यटकांना पर्यटन करण्यासाठी पर्यायी कर्मचार्‍याची व्यवस्था केली जाते. पूर्णवेळ कर्मचारी नेमण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर बोलून कार्यवाही करण्यात येईल.
-अर्जुन म्हसे, उपवनसंरक्षक, जुन्नर