डॉक्टर ताठरच!

0

मुंबई : संपकरी डॉक्टरांचा प्रश्‍न अधिकच चिघळत चालला आहे. एका बाजूला डॉक्टरांनी आंदोलन ताणले आहे, तर दुसर्‍या बाजूला सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. आज रात्री 8 पर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू, असा शेवटचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. जेजे रुग्णालयाने संपावर गेलेल्या डॉक्टरांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, राज्यभरात अनेक ठिकाणी कारवाईला सुरुवातदेखील झाली आहे. मार्ड डॉक्टरांना कॉलेज प्रशासन आणि डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन विभागाने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास नोंदणी रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कामावर रुजू व्हा अन्यथा होस्टेल खाली करा, असा अल्टिमेटमही राज्य सरकारकडून देण्यात आला आहे.

कोर्टापाठोपाठ प्रशासनानेही खडसावले
उच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी म्हटले होते की, डॉक्टरांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे. जर त्यांना मारहाणीची इतकी भीती वाटते, तर त्यांनी नोकरी सोडावी. आता मार्डच्या डॉक्टरांना कॉलेज प्रशासन आणि डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन विभागानेही खडसावले आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा बुधवारी निवासी डॉक्टरांनी संप मागे न घेतल्याने राज्य सरकारने आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. कामावर रुजू व्हा अन्यथा वसतिगृहातील खोल्या खाली करा, असे अल्टिमेटमच बुधवारी राज्य सरकारकडून देण्यात आले. याशिवाय, जे निवासी डॉक्टर कामावर येणार नाहीत, त्यांचा सहा महिन्यांचा पगार कापण्याचा इशाराही सरकारने दिला आहे.

नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित
नागपूरच्या सरकारी रुग्णालयातील 370 डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे, तर सोलापुरात 114 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत रजेवर गेलेल्या डॉक्टरांना नोंदणी रद्द करण्याची ताकीद देण्यात आली आहे, तर पुण्यातील 200 डॉक्टरांना नोटीस धाडण्यात आली आहे. बेकायदेशीररीत्या सामूहिक रजेत सहभागी झाल्याचा ठपका डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे.

हेल्मेट घालून डॉक्टर रुग्णालयात
महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या समर्थनार्थ आता दिल्लीत डॉक्टरही मैदानात उतरले आहेत. राज्यात वाढत्या हल्ल्यांमुळे निवासी डॉक्टरांनी संप पुकारला असतानाच महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या समर्थनार्थ आता दिल्लीतील डॉक्टरही मैदानात उतरले आहेत. बुधवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टर चक्क हेल्मेट घालून रुग्णालयात आले होते. आमचा महाराष्ट्रातील डॉक्टरांना पाठिंबा असल्याचे एम्समधील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने म्हटले आहे. एम्समधील निवासी डॉक्टर चक्क हेल्मेट घालून रुग्णालयात फिरत होते. सुरुवातीला रुग्णांनाही हा प्रकार काय आहे हे समजले नाही. शेवटी डॉक्टरांनी हेल्मेट का घातले याचा उलगडा केला आणि संभ्रम दूर झाला. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही हेल्मेट घालून रुग्णालयात आलो आहोत, असे या डॉक्टरांनी सांगितले.