डॉक्टर होण्यापूर्वी मानसिक क्षमता वाढवायला शिकले पाहिजे

0

‘मला डॉक्टरच का व्हायचंय?’ मार्गदर्शनपर कार्यक्रमात तज्ज्ञांचा सल्ला

पुणे – महागलेले शिक्षण, वाढलेली स्पर्धा, डॉक्टर झाल्यावर करावा लागणारा अनेक संकटांचा सामना, रुग्णांचा रोष, वेळप्रसंगी होणारी रुग्णालयाची तोडफोड आणि डॉक्टरला होणारी मारहाण, मोठ्या रुग्णालयातील व्यवस्थापनाकडून वाढलेला दबाव आणि डॉक्टरला बळीचा बकरा बनविण्याची खेळी यामुळे डॉक्टरच आयसीयूमध्ये जातो. त्यामुळे डॉक्टर होण्याचा नीट विचार करावा आणि या सगळ्या संकटाना तोंड देण्याची मानसिक क्षमता ठेवावी, असा सल्ला तज्ज्ञांनी नुकताच विद्यार्थी व पालकांना दिला.

डीपर, सजग नागरिक मंच आणि सिस्कॉम यांच्या वतीने ‘मला डॉक्टरच का व्हायचंय?’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. श्रीराम गीत, डॉ. गजानन एकबोटे, राजेंद्र धारणकर, विवेक वेलणकर, हरीश बुटले यांनी मार्गदर्शन केले. डीपर संस्थेच्या बाराव्या आणि ‘तुम्ही आम्ही पालक’ मासिकाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजिले जाणार आहेत.

नियमित सरावावर भर हवा
वेलणकर म्हणाले, वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेची तयारी अकरावीपासूनच करणे योग्य ठरते. परीक्षेच्या आधी काही महिने नियमित सराव करण्यावर भर दिला पाहिजे.

धारणकर म्हणाले, आज शिक्षण अतिशय महागडे आणि आवाक्याबाहेरचे झाले आहे. शासनाने ही परिस्थिती स्वतःहून ओढवून घेतली आहे.

पेशा बदनाम होत आहे
डॉ. गीत म्हणाले, अनेकदा चुका नसतानाही डॉक्टरांना दोषी ठरविले जाते. त्याचा नाहक बळी जातो. आज डॉक्टरी पेशा बदनाम होऊ लागला आहे. शिवाय डॉक्टर होणे सामान्यांच्या आवाक्यात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अनुभवी डॉक्टरांना भेटून मार्गदर्शन घ्यावे व डॉक्टर होण्याचा निर्णय घ्यावा.

बुटले म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी मुलांच्या अभ्यासात डीपरचे मोलाचे योगदान राहायले आहे. दरवर्षी पहिल्या शंभरात डीपरचे विद्यार्थी असतात. परीक्षेचे तंत्र समजावून सांगण्यासह चांगला सर्व करून घेणेही अशा परीक्षांमध्ये महत्त्वाचे ठरते.