मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या तीन संपत्तींचा अखेर लिलाव करण्यात आला असून, 11 कोटी 50 लाख रुपयांना ही संपत्ती सैफी बुर्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने बोली लावून विकत घेतली आहे. दाऊद ज्या घरात राहिला होता त्या घरासह एकूण सहा फ्लॅट, शबनम गेस्ट दाऊस आणि रौनक अफरोझ (दिल्ली जायका) नावाचे हॉटेल अशा तीन संपत्तींचा लिलाव मंगळवारी पार पडला. हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी हे गेल्या लिलावाप्रमाणे यंदाच्याही लिलावात सहभागी झाले होते. चक्रपाणी यांना दाऊद ज्या घरात रहायचा तिथे शौचालय बनवायचे होते. पाकमोडिया स्ट्रीटवरील सहा फ्लॅट तीन कोटी 53 लाखांना विकले गेले. अफरोझ हॉटेल 4 कोटी 53 लाखांना तर शबनम गेस्ट हाऊस 3.52 कोटींना विकले गेले. या पूर्वीदेखील दाऊदच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला होता. दाऊदची गाडी स्वामी चक्रपाणी यांनी विकत घेतली होती, ही गाडी विकत घेऊन नंतर ती जाळून टाकली होती.
ऑनलाईन अर्ज मागवून केला लिलाव
दाऊदच्या दक्षिण मुंबईतील या तिन्ही मालमत्तांचा चर्चगेटच्या आयएमसी बिल्डिंगमधील किलाचंद कॉन्फरन्स रुममध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान लिलाव करण्यात आला. यावेळी स्वामी चक्रपाणी यांनीही बोली लावल्या; पण त्यांना दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यात अपयश आले. पाकमोडिया आणि याकूब स्ट्रीटच्या कॉर्नर असलेल्या डामरवाला बिल्डिंगमध्ये 80 च्या दशकात दाऊद आणि त्याचे कुटुंबीय राहात होते. आता या मालमत्ता सैफी बुर्हाणी विकास ट्रस्टच्या मालकीच्या झाल्या आहेत. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सीबीआयने दाऊदच्या 10 मालमत्ता जप्त केल्या होत्या. यापैकी अफरोज, शबनम गेस्ट हाऊस आणि डांबरवाला इमारत यांचा पुन्हा लिलाव करण्यात आला. त्यासाठी ऑनलाईनही अर्ज मागविण्यात आले होते. यापूर्वीही दाऊदच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव झाला होता. मात्र, ही संपत्ती घेण्यास कोणीही पुढे आले नव्हते. याआधी 2015 मध्ये माजी पत्रकार बालकृष्णन यांनी हॉटेल अफरोजची बोली लावली होती. ही बोली त्यांनी जिंकलीदेखील. मात्र, बोली जिंकल्यानंतरची रक्कम त्यांना भरता आली नाही. तर 2002 मध्ये दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनीदेखील असा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे, या दोघांनाही त्या काळात मोठी प्रसिद्धी मिळाली होती.