दाऊद इब्राहिमच्या ब्रिटनमधील संपत्तीवर टाच
नवी दिल्ली : 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील 4 हजार कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्याच्याभोवती फास आवळण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असून, वेगवेगळ्या देशांकडे त्याच्या कुकर्माचे पुरावे भारताने दिले आहेत. 2015 मध्ये ब्रिटनलाही भारताने ही फाइल दिली होती. त्या आधारे तपास करून ब्रिटिश सरकारने दाऊदच्या संपत्तीवर टाच आणली आहे. वॉरविकशायरमधील एक हॉटेल आणि अनेक घरे दाऊद इब्राहिमच्या नावावर होती. त्याला ब्रिटिश तपास यंत्रणांनी सील ठोकले आहे. ब्रिटनच्या या कारवाईमुळे भारताच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर्स
दाऊद इब्राहिम पाकिस्तानने आश्रय दिला असल्याचे भारताचे ठाम मत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांचे त्याच्या हालचालीकडे लक्ष आहे. गेल्या महिन्यात ब्रिटनच्या वित्तखात्याने एक यादी जाहीर केली होती. त्यात, दाऊदचे पाकिस्तानातील तीन पत्ते देण्यात आले आहेत. फोर्ब्समधील माहितीनुसार दाऊदची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर्स असून, जगातील श्रीमंत गँगस्टर्सच्या यादीत तो दुसरा आहे. कोलंबियातील ड्रग माफिया पाब्लो एस्कोबार या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
दाऊदच्या आर्थिक साम्राज्याला झटका
दाऊद इब्राहिमकडे वॉर्कशायर येथे एक हॉटेल आणि अनेक घरे आहेत. या संपत्तीची किंमत हजारो कोटी आहे. एका अहवालानुसार लंडनमध्ये हर्बर्ट रोड येथे दाऊदने 35 कोटी रूपयांची संपत्ती खरेदी केली होती. तसेच स्पीटल स्ट्रीट येथे अलिशान हॉटेल तररोहम्पटन येथे कमर्शियल बिल्डिंग आहे. लंडनमध्येच जॉन्सनवुड रोडवर एक मोठे घर तर शेफडर्स, रोमफोर्ड येथे हॉटेल आणि अन्य संपत्ती आहे. 4 हजार करोड रूपयांची संपत्ती जप्त झाल्याने दाऊदच्या दहशतवादी साम्राजाला मोठा झटका बसला आहे.