‘डॉन’ला भारतात परत यायचे; पण अटी अन् शर्तीवर!

0

इकबाल कासकरचे वकील केसवानी यांची माहिती

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात परतण्याची इच्छा आहे, अशी माहिती त्याच्या भावाचे वकील श्याम केसवानी यांनी दिली आहे. ते ठाणे जिल्हा न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. भारतात येण्यासाठी दाऊदने काही अटी घातल्या आहेत. त्याच्या अटी सरकारला मान्य नाहीत, असेही अ‍ॅड. केसवानी यांनी सांगितले. त्यात प्रामुख्याने खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात ठेवावे, अशी अट त्याने सरकारसमोर ठेवली आहे. परंतु, सरकारने त्याचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

यापूर्वीही परतण्याची केली होती इच्छा व्यक्त
दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याच्यावरील खटल्याच्या सुनावणीसाठी अ‍ॅड. केसवानी ठाणे न्यायालयात आले असता त्यांनी ही माहिती दिली. भारतात आल्यानंतर सर्वात सुरक्षित असलेल्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात यावे, अशी दाऊदची प्रमुख अट आहे. त्याने काही वर्षांपूर्वीच भारतात परत येण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यावेळी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्याशीही यासंदर्भात बोलला होता, असेही केसवानी यांनी सांगितले. विविध आजारांनी जर्जर झालेल्या दाऊदला भारतात परतण्याची इच्छा आहे, असे जेठमलानी यांनी सांगून, त्याबाबत सरकारशी चर्चा केली होती. परंतु, तत्कालिन डॉ. मनमोहन सिंग सरकारने त्याच्या अटी व शर्ती फेटाळल्या होत्या. उलटपक्षी त्याला पाकिस्तानातच ठार मारण्याचे नियोजन केले होते.

राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यात तथ्य?
मुंबईतील अंडरवर्ल्डवर एकेकाळी दाऊदचे साम्राज्य होते. 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दाऊद हा प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचाही गंभीर आरोप आहे. खंडणी, खून, अमलीपदार्थांची तस्करी, खोट्या नोटा आदी काळेधंदे तो करत होता. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर तो दुबईत पळून गेला. सध्या दाऊद पकिस्तानातील कराची येथे असल्याचे पुरावे भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी दाऊद हा आता म्हातारा आणि अपंग झाला असून, त्याला भारतात यायचे आहे, पण त्याला भारतात आणून आपण पराक्रम केला असे भाजपला दाखवायचे आहे, असे वक्तव्य केले होते. अ‍ॅड. केसवानी यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांच्या वक्तव्यात तथ्य होते, असे दिसत आहे.