बाळासाहेब जानराव : महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे अभिवादन
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाच्या विकासाला दिशा दिली. सर्व समाजाला एकसंध ठेवत समतेची वागणूक देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आजच्या घडीलाही बाबासाहेबांचे विचार देशाच्या प्रगतीला पूरक आहेत, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या स्मृतिदिनानिमित्त (महापरिनिर्वाण दिन) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अॅड. मंदार जोशी, महेश शिंदे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, नीलेश आल्हाट, विठ्ठल गायकवाड, शाम गायकवाड, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, शैलेश चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.
बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी
बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा, लेखणीचा उपयोग समाज आणि देशाच्या हितासाठी केला. त्यांनी केलेले कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजातील भेदभाव विसरून त्यांनी दिलेल्या विचारांवर आपण सर्वांनी चालणे हेच त्यांना अभिवादन असेल, असे बाळासाहेब जानराव यांनी सांगितले. बाबासाहेब आपल्यातून लवकर गेल्याने देशाची प्रगती मंदावली. आणखी काही वर्षे बाबासाहेब जगले असते, तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी असली असती. आरक्षणावरून सध्या सुरू असलेला घोळही आपल्याला पाहायला मिळाला नसता, असे परशुराम वाडेकर यांनी सांगितले. महेश शिंदे, अॅड. मंदार जोशी यांनीही यावेळी मत व्यक्त केले.
प्रशासनातर्फे अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार हनुमंत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी निवासी नायब तहसिलदार रमेश पाटील, नायब तहसिलदार संजय पांढरपट्टे, अमोल सोनवणे, सुजाता व्होरकाटे तसेच तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.