डॉ.आंबेडकर स्मारकाच्या जमिनीचे हस्तांतरण झालेय!

0
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा दावा 
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जमीन हस्तांतरण व नकाशाही मंजूर झाली नसल्याची माहिती  विधानभवनात झालेल्या विनंती अर्ज समितीच्या बैठकीत अधिका-यांच्या उत्तरातून समोर आली असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र या स्मारकासाठी जमिनीचे हस्तांतरण झाले असल्याचा दावा केला आहे.
भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत या स्मारकाच्या जमीन हस्तांतरणाविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले कि, या स्मारकाच्या जमिनीचे हस्तांतरण झाल्याचे पत्र केंद्रीय वस्त्रोद्योग  मंत्री स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावर अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली असल्याची माहिती आठवले यांना दिली असता त्यांनी यावर उत्तर देणे टाळले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जमीन हस्तांतरण व नकाशाही मंजूर झाली नसल्याची बाब उघडकीस आली असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक 11 नोव्हेंबर 2015 ला मोठया थाटामाटात करोडो रूपये खर्च करून भूमिपूजन करण्यात आले असून ही आंबेडकरी जनतेची फसवणूक असल्याचा आरोप आमदार प्रकाश गजभिये यांनी केला होता.