जळगाव। येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात नाक-कान-घसाच्या तब्बल 120 रूग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात घेण्यात आलेल्या मोफत शस्त्रक्रिया शिबीरात नाक-कान-घसाशी संबंधीत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अवघ्या दहा दिवसात या शस्त्रक्रिया वैद्यकीय तज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल आणि डॉ.चौहान संघाने केले. यात कानाचा पडदा फाटणे, कानातून पु येणे, कर्णबधीरपणा, नविन पडदा बसविणे, वाकडे नाक, नाकात वाढलेले हाड, नाकात झालेली गाठ, घसाचा कॅन्सर, थॉयराईड, लॅरींगोस्कोपी या सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या सहाय्याने करण्यात आल्या.
कानाच्या 55, नाक- 35, आणि घसाच्या 30 अशा एकूण 120 रूग्णांवर वैद्यकीय तज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ.चौहान यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. चैतन्य पाटील व डॉ. कल्पना कोळी यांनी सहकार्य केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात घेण्यात आलेल्या शस्त्रक्रिया शिबीरात अत्यंत गरजू रूग्णांनी सहभाग घेतला. काही शस्त्रक्रिया या जोखमीच्या होत्या, परंतु आधुनिक तंत्रज्ञान आणि डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील सुविधांमुळे या शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले.