फैजपूर प्रांत कार्यालयावर नागरीकांचा मोर्चा ; नायब तहसिलदारांना दिले निवेदन
फैजपूर- फैजपूर येथील डॉ. शैलेंद्र खाचणे यांना 25 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी शाम पुनाजी इंगळे, शांताराम मांगो तायडे, व शेख युनूस शेख अय्युब या तिघांना पोलिसांनी त्वरित अटक करावी. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्यांच्यावर हद्दपारी व मोक्का सारखी कठोर कारवाई करावी.अशा मागणीसाठी सोमवारी नागरिकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.
प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा
डॉ खाचणे यांना वरील तिघही आरोपींनी शेत जमिनीचा ताबा सोडावा अन्यथा 25 लाखाची खंडणी द्यावी यासाठी डॉ खाचणे यांना दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळून डॉ खाचणे यांनी पोलिसात वरील संशयीताविरूद्ध तक्रार दिल्याने खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गुन्हा दाखल होवूनही संशयीतांना अटक होत नसल्याने सोमवारी नागरीकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.या प्रसंगी विरोदा येथील रहिवाशी व जे. टी. महाजन सेमी इंग्लिश मिडियमचे प्राचार्य नंदकुमार सोनवणे तसेच सेवा निवृत्त पोलीस कर्मचारी शेख शकील यांनी पोलीस आरोपींना मदत करीत असल्याचा गंभीर आरोप करीत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी प्रांतकार्यालयातील नायब तहसीलदार पि. सी. धनगर यांना निवेदन देण्यात आले. मोर्च्यात प्राचार्य नंदकुमार सोनवणे, माजी नगरसेवक केतन किरंगे, पप्पू चौधरी, गोटू भारंबे, शेख शकील शेख दगु, रविंद्र सरोदे, किरण पाटील, यासह विरोदा, पिंपरुड, वढोदा, न्हावी, वनोली, फैजपूर येथील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, फौजदार जिजाबराव पाटील, फौजदार आधार निकुंभे यांचेसह पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता.