पुणे । बाबू जगजीवनराम साहित्य संस्कृती अकादमीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी (दि.12) दिल्लीतील राजेंद्र भवनात होणार्या कार्यक्रमात लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार व दिल्लीचे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते डॉ. गंगवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली येथील बाबू जगजीवन राम कला, संस्कृती व साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नफेसिंह खोबा, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे आदी उपस्थित राहणार आहेत. संगमनेर आणि अकोला तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजासाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम गेली अनेक वर्षे डॉ. गंगवाल करीत आहेत. त्याचबरोबर समाजात अहिंसा रुजावी, व्यसनमुक्ती व्हावी आणि पशुबळी विरोधी चळवळ उभारावी, यासाठी डॉ. गंगवाल यांनी व्यापक काम केले आहे. त्यांच्या या वैद्यकीय आणि अहिंसा सेवा क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.